बिंदल प्लाझा अग्नीकांडाचा सातवा दिवस,अद्याप गुन्हा दाखल नाही

0
6

सात जणांचा या घटनेत मृत्यू,पोलीस राजकीय दबावात

गोंदिया,दि.29,- : शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौकातील बिंदल प्लाझा या हाॅटेलात गेल्या बुधवारी 21 डिसेंबरला घडलेल्या अग्नीकांडात निष्पाप सात जणांना आपला जीव गमवावा लागला.या घटनेला आता सात दिवस पुर्ण झाले आहेत. परंतु अद्यापही गोंदिया शहर पोलीसांनी या घटनेत झालेल्या जिवीतहानीला दुर्लक्ष करीत हाॅटेल मालकावर अद्यापही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला नाही,जो अशा घटनामध्ये लगेच करण्यात येते.गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक व तपास अधिकारी जितेंद्र बोरकर यांच्यानुसार जोपर्यंत नगरपालिकेच्या अग्निशमन विभाग व नगररचनाकार विभागाचा अहवाल येणार नाही,तोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी वर्तविली आहे.विशेष म्हणजे हे हाॅटेल भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तसेच जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष डाॅ.राध्येशाम अग्रवाल यांच्या मुलगा आशिष राध्येशाम अग्रवालच्या नावे आहे.गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे हे सख्खे नातेवाईक असल्यानेच याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणेकडून टाळाटाळ केली जात आहे.जेव्हा एवढ्या मोठ्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,उपविभागीय अधिकारीसह जिल्हाधिकारी व पोलीस विभागाच्या संबधित अधिकार्यावर कारवाई करुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यायला हवे होते.पंरतु सध्या गोंदिया नगरपरिषदेची निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल असल्यानेच भाजपसह सर्वच पक्ष या प्रकरणात चुप्पी साधून बसले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेतही भाजप सरकारच्या स्वच्छ व निष्पक्ष प्रशासनाबाबत शंका निर्माण झाली आहे.

एवढी मोठी घटना जिल्ह्यातील इतिहासतली पहिलीच आहे,परंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे यांनीही या घटनेबाबत माध्यमांशी सवांद साधलेला नाही,उलट या प्रश्नाबाबत ते टाळाटाळ करीत असल्याचे त्यांना संपर्क केल्यानंतर दिसून आले.