साहित्य संमेलनात बोलीभाषांचा जागर

0
6

ठाणे दि. 17 — अलीकडे बोलीभाषेला दुय्यम स्थान मिळत आहे. त्यातही बोलीभाषेत सादर होणाऱ्या कविताही कमीच. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात “बोलीभाषेचा कवी कट्टा’ सादर होणार आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच बोलीभाषा संवर्धनार्थ एक मोठे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक बोलीभाषा आहेत. या बोलींचा गोडवा व लहेजा काही निराळा; परंतु मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजी वा हिंदीचा मारा लक्षात घेता, बोलीभाषेकडेही आता दुर्लक्ष होत आहे. बोलीभाषा जतन व्हावी, या दृष्टीने साहित्य संमेलनाने बोलीभाषेचा एक कवी कट्टा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बोलीभाषा कवी कट्ट्यावर आगरी-कोळी, मालवणी, अहिराणी, वऱ्हाडीसह सर्व बोलीभाषांचा समावेश करण्यात येणार आहे. या कट्ट्याच्या नियोजनाची जबाबदारी सर्वेश तरे, गजानन पाटील, तसेच डॉ. अनिल रत्नाकर यांच्याकडे आहे. या कवी कट्ट्यात जास्तीत जास्त बोलीभाषांतील कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक कवीने तीन मिनिटांत सादर होईल, अशी स्वरचित एक कविता 26 जानेवरीपर्यंत पाठवावी. कवितेत अश्‍लील व सामाजिक भावना दुखावणारे शब्द नसावेत.

कविता पाठविताना नाव, पत्ता व दूरध्वनी नमूद करावा. प्राप्त कवितांची साहित्य निवड समितीद्वारे छाननी करून निवडक कवितांच्या सादरीकरणासाठी कवींना तारीख व वेळ कळवली जाईल. कविता पाठवण्यासाठी पत्ता : 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, पहिला मजला, चार रस्ता, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे. संपर्क – 9096720999.
ई-मेल – [email protected]