रेल्वे व्हॅनची आमोरासमोर धडक

0
6

तुमसर(भंडारा) दि. 17 – मुंबई- हावडा डाऊन रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक असताना रेल्वेच्या दोन टॉवर व्हॅन आपसांत धडकल्या. या अपघातामध्ये 14 रेल्वे कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास तुमसररोड ते मुंडीकोटा रेल्वेमार्गावर घडला. रेल्वे विभागाने डाऊन रेल्वेमार्गावर रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक केला होता. सुमारे 50 ते 75 रेल्वेकर्मचारी कर्तव्यावर होते. दरम्यान दोन टॉवर व्हॅन एकाच ट्रॅकवर आमारासामोर आल्याने जोरदार धडक झाली. यात दोन्ही व्हॅनच्या दर्शनी भागाच्या काचा फुटून उडाल्याने 14 रेल्वेकर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले. यात परशुराम कुमार (वय 30), बी.के.विश्‍वास(50), रतीराम भेलावे(वय 45), दिनेश सावंत(वय 42), विजय लिल्हारे (वय 26), सीताराम बिस्वास((वय 42), दुधराम नागपुरे(वय 56), हिरालाल प्रसाद(वय 36), रामा नायडू (वय 50), रमेश सिरफुडे( वय 50), शिवाय साबळे(वय 45), अतुल रंगारी( वय 36) कृष्णा कडवे(वय 20), पुरुषोत्तम पाल(वय 26) सर्व रा. तुमसररोड यांचा समावेश आहे.

जखमींवर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. हा अपघात मानवी चुकीमुळे झाला की, यांत्रिक कारणामुळे ही बाब अद्याप संदिग्ध आहे. अपघात स्थळी नागपूर विभागाचे रेल्वे महाव्यवस्थापक अमित अग्रवाल येणार होते. परंतु, ते खात रेल्वेस्थानकावरूनच परत गेल्याचे कळले. छिंदवाडा येथून रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी तुमसर रोड येथे दाखल झाले होते. मध्यरात्री धुक्‍यामुळे हा अपघात घडल्याची शक्‍यता सूत्रांनी दिली. मुख्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक करताना विशेष दक्ष राहून वेळेत काम करण्याचे प्रशिक्षण रेल्वे कर्मचाऱ्यांना दिले जाते. दरम्यान या अपघातामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या अपघाताविषयी अधिक विस्तृत माहिती देण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला.