कारुटोल्यात सावित्रीच्या लेकींनी दाखविला स्वावलंबनाचा मार्ग

0
15

यशकथा- महिला दिनानिमित्त
कोणतेही काम करण्याची तयारी असली की मार्ग नक्कीच सापडतो. त्याला मार्गदर्शनाची जोड मिळाली की विकासाचा मार्ग प्रशस्त होतो. गोंदिया तसा मागास, दुर्गम व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असंघटीत महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करुन त्यांना उद्योग/व्यवसायाचे प्रशिक्षण देवून स्वावलंबनाचा मार्ग दाखविला तो महिला आर्थिक विकास महामंडळाने.
सालेकसा तालुका तसा मागास, नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्यातील आमगाव-देवरी मार्गावर असलेले कारुटोला नावाचं गाव. १९० कुटुंब असलेल्या कारुटोल्याची लोकसंख्या ७७७ इतकी आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ३० जानेवारी २००३ मध्ये गावातील १४ महिलांना एकत्र करुन सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाची स्थापना केली. सुरुवातीला महिन्याला प्रति महिला २० रुपये बचत करायच्या आता ही बचत प्रत्येकीची बचतगटात महिन्याकाठी १५० रुपये होत आहे.
सावित्रीबाई फुले बचतगटातील महिलांना माविमचे योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांच्यात व्यवसाय सुरु करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. गावातील शाळेला आहार पुरवठा करण्यासोबत स्वस्त धान्य दुकान चालविण्याचे काम या बचतगटातील महिला करीत आहे. ५ महिलांनी दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाख रुपये कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या आहेत. २ महिला भाजीपाला व्यवसाय, ४ महिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला असून २ महिलांनी बचतगटाच्या भरोशावर शेतीसुध्दा खरेदी केली आहे. तसेच याच बचतगटातील महिला हळद मशीन व शिवणकामाचा व्यवसाय करुन स्वावलंबी जीवन जगत आहे. सावित्रीबाई बचतगटातील महिलांनी आयसीआयसीआय बँकेचे ७ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले असून कर्जाची हप्ते त्या वेळीच भरत आहे. संजीवनी ग्रामसंस्थेने या गटाला सामुदायिक गुंतवणूक निधीतून ५० हजार रुपये दिले आहे.
गरीबांची गाय म्हणून ओळख असलेल्या बकरी पालन व्यवसायाला बचतगटातील सर्वच महिलांनी सुरुवात केली. या व्यवसायातून प्रत्येक महिलेला ५००० रुपये नफा मिळाला. मिळालेल्या नफ्यातून आपण सक्षमपणे व्यवसाय करु शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. सालेकसा येथील लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून जानेवारी २०१४ मध्ये आयसीआयसीआय बँकचे ३ लक्ष रुपयांचे कर्ज सावित्री बचतगटातील सर्व महिलांनी घेतले. घेतलेल्या कर्जाची गुंतवणूक त्यांनी विविध व्यवसायात केली. ३६ महिन्यात न चुकता दर महिन्याला १०५०० रुपये याप्रमाणे मासिक किस्तही भरली. त्यानंतर त्यांनी पुन्हा ७ लक्ष ५० हजार रुपये कर्जाची मागणी बँकेकडे केली. बँकेने बचतगटाचा व्यवसाय आणि बँकेकडे केलेली कर्जाची परतफेड हे बघता मागणीप्रमाणे ७ लक्ष ५० हजार रुपयाचे कर्ज देखील दिले. बचतगटातील ६ महिलांनी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी या कर्जाचा विनियोग केला. दर महिन्याला २६ हजार २५० रुपये कर्जाची परतफेड नियमीत करीत असून २४ महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १५ लक्ष रुपये कर्ज घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
सावित्रीबाई फुले बचतगटातील महिला दुग्ध व्यवसाय करीत असल्यामुळे दुधापासून दही, ताक, तुप हे सुध्दा त्या तयार करुन विकत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा दर्जा अत्यंत चांगला असून मोठ्या प्रमाणात ग्राहक त्यांनी तयार केलेल्या दुधाच्या वस्तू खरेदी करीत आहे. बचतगटामुळे सावित्रीबाई फुले बचतगटातील सर्व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला आहे. घरच्या कत्र्या पुरुषाला आर्थिक मदतीचा हात देखील हया महिला देत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं रहाटगाडगं चांगल्याप्रकारे सुरु आहे. सालेकसा सारख्या दुर्गम नक्षलग्रस्त भागातील या महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय सुरु करुन एक आदर्श निर्माण केला आहे. एवढंच नव्हे तर सावित्रीबाईच्या हया महिला गावातील विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने भाग घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जिल्ह्यातील सर्वात जास्त कर्ज घेणारा व घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणारा बचतगट म्हणून सावित्रीबाई फुले बचतगटाची ओळख निर्माण झाली आहे. २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या बचतगटातील सर्व महिलांना सन्मानीत देखील करण्यात आला.
०००००