व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी – सत्यपाल महाराज

0
28

देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य सम्मेलनाचे थाटात उद्घाटन
अमरावती ,दि.20 –: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कामुळे आज व्यसनमुक्ती साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून महिलांना संधी मिळाली आहे. त्याच बरोबर समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या महापुरुषांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे एक छोटे काम मला सोपविण्यात आले आहे. हे काम सर्व समाजाचे असुन त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एकातरी व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ या निमित्ताने घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचे संम्मेलनाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मावळत्या संम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, समाज कल्याण विभागाचे आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, उपायुक्त भीमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते उपस्थित होते.
सत्यपाल महाराजांनी विनोदाच्या माध्यमातून व्यसन करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमांतून लोक व्यसनाच्या आहारी कसे जातात हे पटवून दिले. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अमरावतीचा उल्लेख रत्नांची खान असा करुन समाजातील बदलत्या व्यसनाधिनतेवर प्रकाश टाकला. शासन समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करीत आहे. त्याचबरोबर नागरिकांची व समाजाची जबाबदारी मोठी आहे. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांची जबाबदारी वाढली आहे. काही माणसे पुरस्कारापलीकडे असतात. अशा माणसांना मिळालेले पुरस्कार हे पुरस्काराची शोभा वाढविणारे असतात असे प्रशंसोद्गार संम्मेलनाध्यक्ष सत्यपाल महाराज यांच्याबद्दल काढले. व्यसनाधिनतेमुळे केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटूंबाचा तोटा होत नसुन संपूर्ण समाजाचा नाश होतो. अशा संम्मेलनाच्या माध्यमातून आपला समाज व्यसनमुक्त करण्यासाठीचे मोठे काम होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
व्यसन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:चा मुलगा म्हणून थांबविण्याची मनोवृत्ती जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होणार नाही तो पर्यंत पुढची पिढी व्यसनधिनतेकडे जाण्या वाचून आपण थांबू शकणार नाही. अशा पद्धतीची व्यसनमुक्तीची संम्मेलने प्रत्येक जिल्ह्यात झाली तर महाराष्ट्रात एकही व्यक्ती व्यसनाधिन राहणार नाही, असे मत पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केले.
व्यसनमुक्ती साहित्य ठेवलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते झाले. तसेच यावेळी व्यसनमुक्तीची शपथ सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्व उपस्थितांना दिली. प्रास्ताविकातून पीयुष सिंह यांनी व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाची भूमिका विषद केली. या कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर तर आभार भालचंद्र मळे यांनी व्यक्त केले.

व्यसनमुक्तीसाठी यांना मिळाले पुरस्कार

व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना शासनाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप संस्थेसाठी 30 हजार रुपये तसेच व्यक्तींसाठी 15 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
संस्था – ब्रम्हकुमारीज मेडीकल विंग राजयोग एज्यूकेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन मालेगावं नाशिक, किशनलालजी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, हिमायत नगर, नांदेड, नियती फिलॅर्न्थोपिक सोसायटी, ज्योतिबा नगर तरोडा, नांदेड, रिजनल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग सेंटर, मुक्तांगण मित्र पुणे, निशिगंधा व्यसनमुक्ती केंद्र, मुक्तांगण मित्र पुणे, राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी संचलित जयंत दारिद्य्र निर्मुलन अभियान, इस्लामपूर, सांगली, आरोग्य प्रबोधिनी आमगाव, देसाईगंज गडचिरोली, जागृती ग्रामीण विकास संस्था, एकलारी, भंडारा, महर्षी दयानंद कॉलेज, परेल मुंबई, जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा, मुडाणा, यवतमाळ, एव्हरेस्ट फाऊंडेशन नाशिक, युगांधर फाऊंडेशन परभणी, भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था भाकर, रत्नागिरी, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था औरंगाबाद, राम मनोहर लोहिया प्रतिष्ठाण विकास मंडळ, दगडगाव, नांदेड, डॉर्फ कॅटल केमिकल्स, प्रा.लि.मुंबई या संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
व्यक्ती – निलेश सोमाणी वाशिम, नरेश रहिले गोंदिया, प्रफुल्ल व्यास वर्धा, हेरंब कुलकर्णी अहमदनगर, कार्तिक लोखंडे नागपूर, ॲड.बाळासोहब बानखेले पुणे, गणेश वानखेडे बुलडाणा, धनंजय बामणे सांगली, डॉ.विजय मोरे पिंपरी पुणे, शालनताई वाघमारे कराड सातारा, जयपाल गायकवाड नांदेड, उत्तम गिरी बुलडाणा, प्रदीप माळी औरंगाबाद, निळकंठ बोरोळे अमरावती, प्रसाद ढवळे पुणे, रुस्तम कंपली सोलापूर, तुषार सुर्यवंशी नागपूर, राजाराम पवार रत्नागिरी, डॉ.ज्ञानेश्वर मिरगे, मांगिलाल चव्हाण,जगदेव पवार बुलडाणा, अनंतकुमार साळुंखे सांगली, रामदास धुमाळ औरंगाबाद, संतोष खडसे वाशिम, विजय पांडे आकोट, अकोला, विष्णू मापारी औरंगाबाद, ताणाजी जाधव पनवेल, रायगड, डॉ.अमोल चित्रकार अचलपूर, अमरावती, कैलास पानसरे मुंबई, विजया टाळकूटे जेजुरी, पुणे, हरिशचंद्र पाल चंद्रपूर, अवधूत वानखडे यवतमाळ, डॉ.सुमंत पांडे पुणे, डॉ.राजहंस वंजारी नागपूर, अखिलेश हळवे (झी 24 तास) नागपूर