चिमण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करणार – मुनगंटीवार

0
16

मुंबई दि.20: निसर्गातील जैवविविधता तसेच अन्न साखळी शाबूत राहण्याच्या दृष्टीने चिमण्यांची पर्याप्त संख्या टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेता चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृत्रिमरित्या प्रजनन
करण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सेमिनरी हिल्स नागपूर,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, रामबाग वन वसाहत चंद्रपूर, वन वसाहत औरंगाबाद या ठिकाणांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. याठिकाणी चिमण्यांच्या आढळाबाबत सर्वेक्षण करणे, कृत्रिम घरटी बसविणे,कोनाडे तसेच वळचणी उपलब्ध करणे, बी एन एच एस किंवा इतर तज्ज्ञ यंत्रणांशी सल्लामसलत करून चिमण्यांना खाद्य उपलब्ध करणे, घरट्यांसाठी जागा मिळावी या दृष्टीने मडबाथ, जैविक कुंपण तसेच गवत उपलब्ध करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.वरील उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्याच्या दृष्टीने नियमितपणे चिमण्यांच्या संख्येवर सनियंत्रण करण्यावर भर देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करणे तसेच कृत्रिम घरटी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर सुध्दा भर देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील उपक्रमांमुळे जर चिमण्यांच्या संवर्धनात अनुकूल परिणाम प्राप्त झाला तर या उपक्रमाची इतरत्र पुनरावृत्ती करण्यात येईल आणि अपेक्षित परिणाम न झाल्यास कृत्रिम प्रजननाचा अवलंब करावा लागेल
ज्यामध्ये प्रजनन, पिंजरे, अंडी उबवणे आदी उपक्रमांचा समावेश असेल.यासाठी केंद्रीय प्राणी प्राधिकरण तसेच राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची मान्यता घेण्यात येईल, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.
आपल्या बालपणीच्या कित्येक आठवणींमध्ये चिऊताई अर्थात चिमणीचे विशेष महत्व आपण अनुभवले आहे. लुप्त होत चाललेल्या या निरागस पक्ष्याच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.