उष्माघात व प्रथमोपचार प्रशिक्षण

0
15

गोंदिया,दि.२० : यावर्षी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात व प्रथमोपचार या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, डॉ.भुमेश्वर पटले तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उष्माघातेचा प्रभाव कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. विशेषत: उन्हात अत्यंत कठीण परिश्रम करणाऱ्या वर्गाने याकडे विशेष लक्ष देवून काळजी घ्यावी. माहिती व संरक्षणासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग करुन हवामानाचा अंदाज घ्यावा. दुपारच्या वेळेस परिश्रमाची कामे टाळणे, कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि सावलीसाठी कामाच्या ठिकाणी शेड तयार करुन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात उष्माघातापासून बचाव व उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उन्हाळ्यात काय करावे व काय करु नये, उष्माघाताची लक्षणे, उष्माघाताची लक्षणे दिसताच त्वरित करण्यात येणारी उपाययोजना, घरगुती उपचार आदिंची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमात उष्माघात या विषयावर डॉ.अलका कावरे यांनी प्रशिक्षण दिले. तर डी.जे.त्रिवेदी व डॉ.शितल बंसोड यांनी रॅबिज या विषयावर विस्तृत माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला.