प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
14
????????????????????????????????????

गोंदिया,दि.२८ : सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ २७ मार्च रोजी तिरोडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित बचतगटाच्या महिला मुद्रा बँक योजना मेळाव्यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
आमदार विजय रहांगडाले, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य श्री.अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकत्र्या सविता बेदरकर, मिडिया सोल्यूशन्सचे संचालक उमेश महतो यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या चित्ररथावर शिशु गटामध्ये ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज, किशोर गटामध्ये ५० हजार ते ५ लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज आणि तरुण गटामध्ये ५ लक्ष ते १० लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज या तीन गटातून देण्यात येणारी कर्ज सुविधा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेचे स्वरुप, या कर्जासाठी कोणतेही आनुषांगीक शुल्क नाही, सवलतीचे प्रक्रिया शुल्क, कमी व्याजदर, संयुक्तीक परतावा अवधी, मुद्रा कार्डाद्वारे खेळते भांडवली कर्ज ही या कर्जाची मुख्य वैशिष्ट्ये असून मुद्रा कटकटमुक्त आणि लवचिक, युनिटच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करते ही मुद्रा कार्डची वैशिष्टय असून मुद्रा कार्ड प्राप्त करा व आपला व्यवसाय वाढवा हा संदेशही या चित्ररथावर देण्यात आला असून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व जास्तीत जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी १० मिनिटांची चित्रफित, तसेच ३ ऑडिओ जिंगल्स या चित्ररथात असून अनेकांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यास हा आकर्षक चित्ररथ उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात २४ दिवस हा चित्ररथ विविध गावात भ्रमण करणार असून बसस्थानके, बँका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, महत्वाचे चौक, महत्वाची शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, तालुक्यातील महत्वाच्या गावामध्ये जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणी, गरजू व्यक्ती व महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास चित्ररथाची महत्वाची भूमिका राहणार आहे.