बोर्डा येथे शहीदाच्या कुटुंबियांना भेट;कुटूंबियास दहा लाखाची मदत

0
11

चंद्रपूर,दि.२८ : गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ येथे नक्षली हल्यात शहीद झालेल्या बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम या शहीद जवानाच्या घरी भेट देऊन वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटूंबियांशी चर्चा केली.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंद्र सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे आदी उपस्थित होते. शहीद नंदकुमार यांच्या घरी भेट दिल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी वडील देवाजी आत्राम व आई ताराबाई यांच्याशी चर्चा केली.
शहीद जवानाच्या स्मृतिप्रित्यर्थ बोर्डा येथे स्मारक उभारले जाणार असून स्मारकाच्या प्रस्तावित विविध जागेची पाहणीही ना. सुधीर मुनगंटीवार व अन्य मान्यवरांनी यावेळी केली. गावात शहीद नंदराम यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ प्रेरणादायी स्मारक उभारले जाणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. हे स्मारक योग अभ्यासाचे केंद्र आणि खुली व्यायाम शाळेच्या स्वरूपात असावे. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . यावेळी उपस्थित अधिका-यांना जागा निश्चित करुन तातडीने स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्‍या. यावेळी विद्यार्थांच्या आग्रहाने बोर्डा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसही त्यांनी भेट दिली. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. अनेक चिमुकल्यांनी ना. मुनगंटीवार यांना आपल्या स्वरचीत कविता ऐकविल्या. बोर्डा हे शहीदाचे गाव असल्याने या गावाची शाळा सुंदर आणि बनविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.