आ.कडूच्या आसूड यात्रेला नागपूरातून सुरवात

0
19

नागपूर,दि.11-अमरावती जिल्ह्याचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संस्थेतर्फे आयोजित ‘देवेंद्र ते नरेंद्र’ शेतकरी आसूड यात्रेची सुरवात आज (मंगळवार) 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीदिनी नागपुरातील आमदारनिवास येथून झाली.या यात्रेत मराठवाड्यातील शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, हरीयाणाचे गुरूनामसिंग आदींसह हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत.
आमदार निवास परिसरात झालेल्या छोटेखानी सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर आसूड –ढला. सत्ता आली तर व्यापारी आणि नसली की शेतकरी, असे सगळ्याच सरकारचे धोरण आहे. फडणवीस सरकारही याला अपवाद नाही. विरोधात असताना कर्जमाफी मागणारे आता योग्य वेळेची भाषा बोलत आहे. या सरकारची योग्य वेळ कधी येणार आहे? मुख्यमंत्री कोणाचा हात पाहून योग्य वेळ ठरवणार आहे? असा संतप्त सवाल कडू यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा काढली. आघाडी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या असत्या तर त्यांच्यावर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली नसती, अशी टीकाही कडू यांनी केली. नागपुरातून प्रारंभ झालेली ही आसूड यात्रा 21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गावी पोहोचणार आहे. तेथे रक्तदानाने सांगता होणार असल्याचे कडू यांनी सांगितले.सरकारी नोकरदारांना भरमसाठ पगार आहे. त्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यासाठी तरतुद करणाऱ्या सरकारजवळ फक्त शेतकऱ्यांसाठीच पैसा नाही काय?, असा सवाल कडू यांनी केला.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा द्या, शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे मनरेगातून करण्यात यावी, ऊसतोड कामगारांना हार्वेस्टर यंत्राप्रमाणे प्रतिटन ४०० रुपये मजुरी देण्यात यावी, शेतकरी, शेतमजूर, विधवा, गोरगरीब सैनिकांची रेशनची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी, पंतप्रधान आवास योजनेतील शहरी आणि ग्रामीण दरी दूर करून सरसकट सर्वांना रुपये साडेतीन लाखांचे अनुदान द्या आदी मागण्यांसाठी ही आसूड यात्रा काढण्यात येत आहे.