वन अकादमी व अभ्यास केंद्राला वनविभागाचा खो

0
76

अरण्यपुत्र माधवरावांच्या ११ वा स्मृतीदिन
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.20(berartimes.com)-निसर्गाच्या संरक्षणासाठी बिनीचा शिलेदार म्हणून ओळखल्या जाणारे आणि अरण्यपुत्र अशी उपाधीप्राप्त माधवराव पाटील डोंगरवार. पुण्या मुंबईतील रंगभूमीपासून कोसो दूर घनदाट जंगलात एक वैभवशाली रंगभूमी साकारणारे नाट्यवेडे माधवराव हे एक झाडीपट्टीतील चालतेबोलते विद्यापीठ. माधवराव पाटील डोंगरवारांचे वयाच्या ८३ व्या वर्षी २0 एप्रिल २००६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाला ११ वर्षाचा कालावधी लोटला,पण अजूनही  नवेगावबांधच्या अरण्यपुत्राला अपेक्षित विकास मात्र झालेला नाही.माधवराव पाटलांच्या कार्याची दखल घेत या जिल्ह्यात वनविभागाने नवेगावबांधच्या परिसारत वनअकादमी  किंवा राज्यपातळीवरचे वन्यजीव अभ्यासकेंद्र सुरु करावे अशी त्यांची अपेक्षा होती,परंतु त्याकडे आजपर्यंतच्या सर्वच वनमंत्र्यांनी व वनविभागाच्या प्रमुखांनी जाणिवपुर्वक दुर्लक्षच केल्याने आज ना वन अकादमी ना अभ्यास केंद्र फक्त दुर्लक्षच म्हणण्याची वेळ आली आहे.
माधवराव पाटलांच्या हयातीत नवेगावबांध म्हटले, की कुणीही पुण्या मुंबईहून येणारा वन्यजीव अभ्यासक, पर्यटक त्यांची हमखास भेट घेत शिवाय राहत नसत. एवढेच नाही तर वनविभागाचा कुठलाही वरिष्ठ अधिकाèयाचा दौरा हा त्यांच्याकडील ज्ञानभांडार उघडल्याशिवाय पूर्ण होत नसे.परंतु, आज त्याच अरण्यपुत्र माधवराव पाटलांच्या कार्याकडे खुद्द वनविभागासह ज्यांना पाटलांनी वन्यजीवाबदद्ल आपुलकीची धडे दिले, त्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या कार्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
२ जून १९२३ रोजी सीताराम पाटील डोंगरवार यांच्याकडे जन्माला आलेले माधवराव पाटील हे एक अरण्यविद्यावाचस्पती म्हणूनच ओळखले जात होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईकांशीही त्यांची चांगली सलगी होती. स्व. नाईकांच्या विनंतीवरून त्यांनी शिकार बंद करण्याची निर्णय घेतला आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी ते पुढे आले. शिकार हे पूर्वी पुरुषार्थ मानले जायचं. अशा कुटुंबांत जन्म होऊनसुद्धा नवेगावबांधचा परिसर नॅशनल पार्क व्हावा, म्हणून शिकारीसारखा न सुटणारा मोह त्यांनी त्यागला. लोक त्यांना काहीही म्हणत असले तरी त्यांनी जो त्याग वन्यप्रेमापोटी केला, तो नाकारणे हे अन्यायकारक होईल. आदिवासींशी असलेले नाते माधवरावांनी अधिकच घट्ट केले. त्यांची अरण्यविद्या शिकून घेतली. स्वतःमध्ये अचाट निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्ती विकसित केली. त्यांच्याकडे असलेल्या अफाट ज्ञानभंडाराकडे पाहून जगविख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली व नावाजलेले वनाधिकारी मारुती चितमपल्लीही अचंबित झाले होते. माधवरावांनी वाघ, बिबटे, चित्ते यांच्या शिकारी केलेल्या असल्या तरी त्यांच्या मनात भुतदयेचा झरा सुध्दा होता.

अंगावर गडद हिरव्या रंगाचा शर्ट व धोतर हा माधवराव पाटलांचा हा ड्रेस कोडच होता. पाटलांना एकदा आपण हिरवा रंगाचा शर्ट का वापरताŸ? असे विचारले असता त्यांनी निसर्गात हिरवा रंग कुणाचा असतो, जंगलाच! या जंगलाची जोपासना करण्यासाठीच आपला जन्म झाला, याची पदोपदी आपणास जाणीव व्हावी. म्हणून मी हिरव्या रंगाचे शर्ट परिधान करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी हयात असताना सांगितले होते.
एकदा एका चित्याने जवळपास प्रत्येक गोंडाच्या गोठ्यातील जनावर खाल्ले होते. या चित्याची साèयांनाच धास्ती बसली. माधवराव पाटलांनी गांधारीच्या तळ्याजव‹ळ एक खड्डा खणून त्यात त्यांच्या एका साथीदारासोबत ठाण मांडले. पाणी पिणाèया चित्यावर त्यांनी गोळी झाडली. तेव्हा जखमी चित्याने पाटलांवर हल्ला केला. त्याने माधवरावावर झेप घेतली नेमकी त्याचवेळी माधवरावांची दुसरी गोळी त्याच्या छातीत घुसली आणि तो पाटलांच्या अगदी जवळ येऊन गतप्राण झाला. अशा अनेक चित्तथरारक प्रसंगाची ते आठवून करून देत. ते शिकारीच होत असे नाही, तर ते चांगले अ‍ॅलोपॅथी औषधीचे जाणते सुध्दा होते. बहुतांश औषधी वनस्पतीची माहिती असल्याने माधवराव पाटील डोंगरवार परिसरातील धन्वतरींच होते. जंगलात नेहमी घडणारे सर्पदंश, वन्यपशूंचे हल्ले अशा घटना घडल्या की,आदिवासींची पावले माधवरावांच्या वाड्याकडे वळत. निरजू गोंड या त्यांच्या मित्राचा कुष्ठरोग त्यांनीच ठीक केला होता.
या अरण्यपुत्राच्या चेहèयावर वयाच्या ८३ व्या वर्षी सुध्दा थकवा जाणवत नव्हता. सडपातळ शरीरयष्टी आणि तेजस्वी चेहèयाची ती निर्मळ व्यक्ती होती. परंतु, त्यांच्या प्रत्यक्ष कृतीने त्यांनी या निर्मळ मनाचे कायमचे पावित्र्य टिकवून ठेवले होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी माधवराव पाटलांनी तब्बल ३६ वर्षे अव्याहतपणे कार्य केले. हा वारसा आजच्या घडीला त्यांचा मुलगा आणि नातू तिसèया पिढीच्या रूपाने चालवीत आहेत. धाबेपवनी या गावातील ही व्यक्ती कुणाच्या पुण्याईने नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने आणि सलीम अली,मारुती चितमपल्ली,वसंतराव नाइकांच्या प्रेरणनेच महाराष्ट्राचा खरा अरण्यपुत्र झाला. परंतु, याच अरण्यपुत्राच्या कार्याकडे या जिल्ह्यातील वन्यप्रेमीच नव्हे तर वनविभागानेही काणाडोळा केला की काय? अशी परिस्थिती आहे
विशेष म्हणजे वेगळ्या विदर्भाच्या बाजूने राहिलेल्या माधवराव पाटलांना वेगळा विदर्भ झाला तर विदर्भातील पर्यटनाला चांगले दिवस येऊ शकतात. यासाठी सरकार व विदर्भातील नेत्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. तसेच त्यांची नियत मात्र स्वच्छ असावी. प्रसंगी राजकारण आणि राजकारण्यांचा शिरकाव पर्यटन विकासात होऊ नये,असे पाटलांचे विचार होते.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांशी असलेली मैत्री त्यांनी राजकीय qकवा वैयक्तिक लाभासाठी कधीच वापरली नाही. उलट त्या मैत्रीच्या जोरावरच नवेगावबांध नॅशनल पार्क व्हावा, ही एकमेव मागणी १९७१ मध्ये त्यांनी वसंतरावांकडे केली. त्यांची स्नेहपूर्ण मैत्री आणि वन्यजिवरक्षणाची तळमळ पाहून नाईकांनी त्यावर्षी दिलेलं आश्वासन १९७५ ला नवेगावबांधला नॅशनल पार्क घोषित करून पाळले होते. ती घोषणा होताच त्यांचा उत्साह द्विगुणित होऊन जंगल संपत्ती ही अमूल्य आहे, तिचे रक्षण केले तरच मानवजात सुरक्षित राहू शकेल अन्यथा विनाश अटळ आहे, अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत सरकार, वनविभाग आणि स्थानिक आदिवासींसह इतर लोकांना पटवून देण्याचे कार्य केले. अशा या अरण्यपुत्राच्या कार्याचा विचार आणि उल्लेख करीत वनविभागाने जर या भागात चांगली वनअकादमीची सुरवात करून या भागाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यास माधवरावांना ती खरी आदरांजली ठरेल.