५५ हजार स्वयंसेवकांचा देवगिरी महासंगम

0
14

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी व भविष्याचा वेध घेण्यासाठी ११ जानेवारी रोजी ‘देवगिरी महासंगम’चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी मराठवाडा व खान्देश अशा ११ जिल्ह्यांतील ५५ हजार स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, संघ यंदा ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ९ दशकांच्या वाटचालीत पहिल्यांदाच महाराष्ट्रात संघाचा एवढा भव्य सोहळा होत आहे.

देवगिरी महासंगमच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत संघाचे प्रांत सहकार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, ५५ हजार स्वयंसेवकांपैकी १५ ते ३० वयोगटातील सुमारे ७० टक्के स्वयंसेवक महासंगमात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने सर्वांना संघशक्तीचे दर्शन घडेल. बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवार येथील श्रीराम मंदिर न्यासाच्या ९५ एकर जागेवर शिबीर भरविण्यात येणार आहे. येथील मैदानाला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजनगरी, असे नाव देण्यात आले आहे. प्रांत कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले की, ११ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वयंसेवकांचे महासंगमस्थळी आगमन होणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावा घेण्यात येणार आहे. यात देवगिरी प्रांतातील संघाच्या शाखांचा विस्तार कशा पद्धतीने करायचा यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम सायंकाळी ५.३० वा. सरसंघचालक मोहन भागवत सर्वांना संघाच्या कार्याची नवी दिशा दाखविणार आहेत. देवगिरी प्रांताचे संघचालक अ‍ॅड. गंगाधर पवार आणि विभाग संघचालक अनिल भालेराव यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून महासंगमचे नियोजन करण्यात येत आहे. सुमारे १,५०० स्वयंसेवक यासाठी अहोरात्र काम करीत आहेत.

संघाचे जिल्हा संघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे यांनी सांगितले की, मकरसंक्रांतीनिमित्त ३ लाख घरांमध्ये संघाच्या वतीने ‘सामाजिक समरसतेचे’ संदेशपत्र वाटण्यात येणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी प्रत्येक गावात भारतमातेचे पूजन करण्यात येणार आहे. याचे नियोजन ‘महासंगम’मध्ये जिल्हानिहाय मेळाव्यात करण्यात येणार आहे.