तुमसरात शिवस्मारक प्रस्तावित जागेवरच उभारणार : शिवसेना

0
16

तुमसर दि.१७: : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे उद्यान तुमसर शहराच्या मध्य भागी व्हावे यासाठी आधीच श्रीराम टॉकीजच्या समोर जागा अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे. परंतु स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे आधीच्या प्रस्तावित जागेवर छत्रपती शिवरायांचे स्मारक होऊ शकले नाही याची खंत आहे. म्हणून सदर शिव स्मारक उभारण्यासाठी आता शिवसेनेने हा अनेक वर्षापासून रखडलेला मुद्दा हाती घेतला असून स्मारक तयार करण्याची शपथ घेतली आहे.
तुमसर शहराच्या मध्यभागी श्रीराम टॉकीजच्या अगदी समोरच्या जागेवर सध्या तात्पुरते अतिक्रमण करून काही व्यापार्‍यांचे दुकाने सुरू केली आहे. अशा सर्व व्यापार्‍यांना विनंती करण्यात आली आहे की सदर जागा मोकळी करण्यास मोलाचे सहकार्य करावे व छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्यान पूर्ण होण्यासाठी प्रत्येकांनी स्वखुशीने सहकार्य करावे. यासाठी पक्षपात न करता शहरवासीयांनी शिवसेनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊन शिवसैनिकांना सहकार्य करावे. या जागेवरील अतिक्रमणात असलेल्या व्यापारी बंधूंना शिवसेनेतर्फे योग्य विचार करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्मारकाच्या जागेचे नझुलद्वारे मोजमाप करून स्मारकाच्या आजूबाजूला योग्य जागी अतिक्रमित व्यापारी बंधूंना दुकानाची चाळ बांधून देण्याचा शिव स्मारक समितीद्वारे निर्णय घेण्यात आला आहे, तरी या छत्रपती शिवाजी स्मारकाला तुमसर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.तुमसर तालुक्याचे तहसीलदार बालपांडे यांना यासंदर्भात शिवसेने तर्फे निवेदन देण्यात आले. सध्या त्यांच्याकडे नगरपरिषदचे प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून कार्यभार सुद्धा आहे. १६ मे रोजी निवेदन देताना शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचिबगले, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, वाहतूक सेना शहर प्रमुख किशोर यादव, वाहतूक सेना उपशहर प्रमुख कृपाशंकर डहरवाल, भास्कर भोयर व अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.