बांबूची पर्यावरणपूरक सायकल चर्चेत

0
19

चंद्रपूर,दि.01- जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र साकारत असून सन २0१४ पासून सुरू झालेल्या या केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. लक्षवेधी शोभिवंत वस्तूंसोबतच प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेली बांबूची पर्यावरणपूरक सायकल चर्चेत आली असून ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ समजल्या जाणार्‍या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अवघ्या दोन वर्षांत महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना आगरतळा (त्रिपुरा) येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी घरातील शोभेच्या, रोजच्या गरजेच्या वस्तूंसोबतच आता तंत्रज्ञानाची जोड देत अभिनव प्रयोग सुरू केले आहेत. गेल्या दोन वर्षांत १९४ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांनी साकारलेल्या वस्तूंना जनतेपर्यंत नेण्यासाठी या केंद्राचे संचालक राहुल पाटील प्रयत्नशील आहेत. या प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून तयार करण्यात आलेला राष्ट्रध्वज, ढाल-तलवार, स्मृतिचिन्ह, कंदील (लालटेन), टेबल लॅम्प, स्टडी टेबल, डायनिंग टेबल, सोफासेट, पलंग आदी आवश्यक वस्तूंनीही लक्ष वेधले. मात्र बांबूपासून तयार झालेली सायकल नवीन उपक्रम म्हणून लक्षवेधी ठरली आहे. या प्रशिक्षणार्थ्यांनी आणखी काही सायकलींचे मॉडेल तयार करण्याचे मनोगत व्यक्त केले आहे. या सायकलीच्या आवश्यक चाचणी आणि मान्यतेनंतर एका कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सायकलीचे अनावरण करण्यात येणार आहे.