एमटीडीसी करणार अंबाझरी तलावाचा मेकओव्हर१९ एकर जागेवर पर्यटन विकास

0
7

मुंबई, दि. 8 : नागपूरकरांच्या विशेष आकर्षणाचे व पर्यटनाचे केंद्र असलेल्या प्रसिद्ध अंबाझरी तलावाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) मेकओव्हर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी अंबाझरी तलाव परिसरातील ४४ एकर जागेपैकी १९ एकर जागा एमटीडीसीला भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंजूर केला. एमटीडीसीमार्फत अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यात येऊन याठिकाणी पर्यटकांसाठी अम्युझमेंट पार्क तयार करण्यात येणार
आहे. यामुळे नागपूरकरांचे आकर्षणाचे केंद्र असलेला अंबाझरी तलाव राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळाच्या नकाशावर येणार आहे.
अंबाझरी तलावाची ४४ एकर जमीन नागपूर महानगर पालिकेच्या अखत्यारित आहे. ही जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला होता. अंबाझरी तलावाचा मेकओव्हर होऊन या ठिकाणी वॉटर स्पोर्टसह उच्च दर्जाची मनोरंजनाची साधने उपलब्ध व्हावी आणि अंबाझरी हे उत्कृष्ट पर्यटनस्थळ व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आग्रही होते. त्या अनुषंगाने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी हा महत्वपूर्ण
प्रस्ताव मार्गी लावला. त्यानुसार ४४ एकर जागेपैकी १९ एकर जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला वार्षिक नाममात्र एक रूपया दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानुसार १९ एकर जागा मनपाच्या अखत्यारित राहणार असून ६ एकर जागेत अंबाझरी तलाव आहे. १९ एकर जागेवर एमटीडीसी नऊ कोटी रूपये खर्च करून हेपर्यटनस्थळ विकसित करणार आहे. या ठिकाणी एमटीडीसीमार्फत  क्लबहाऊस, उपाहारगृह, अर्बन हाट आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. उर्वरित १९ एकर परिसराचा विकास मनपामार्फत करण्यात येणार आहे.