एकच लक्ष्य … चार कोटी वृक्ष

0
47

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या वेगळेपणाची छाप जनतेवर उमटवली आहे, अशा मोजक्या नेत्यामध्ये आता राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. विदर्भाच्या मंत्र्यांकडे राज्याची धुरा दिल्यानंतर विदर्भ विकासापासून दूर कसा ? असा प्रश्न विचारणा-याना सद्या चंद्रपूरचा विकास आरसा झाला आहे. जीव ओतून काम करणा-या या नेत्याने अवघ्या महाराष्ट्राला सद्या वनमहोत्सव 2017 या उपक्रमात 4 कोटी वृक्ष लावगडीचे साकडे घातले आहे. यामाध्यमातून
वृक्षलागवडीचा व वृक्षसंर्वधनाचा नवा मंत्र दिला आहे. सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर 1 ते 7 जुलैच्या वनमहोत्सवाची तयारी सुरु आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वन व वन्यजीव प्रेमी या वनमहोत्सव मोहिमेत स्वत:ला झोकून देत असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहवर्धक वातावरण आहे.
गेल्यावर्षी 2 कोटी वृक्षलागवड करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अवघ्या महाराष्ट्राने त्यांना प्रतिसाद दिला. एकाच वर्षी 2 कोटी 82 लक्ष वृक्ष लागवड झाली. यावर्षी देखील 4 कोटी वृक्ष लावगडीची घोषणा केली आहे. पर्यावरणाला जपण्याच्या या मोहिमेत सर्वमतभेद सारुन प्रत्येक जण एक झाड लावेल ऐवढी  माफक अपेक्षा त्यांनी केली आहे. यावर्षी 4 कोटीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला मागील वर्षीच्या वृक्षलागवडीतून किती वृक्ष जीवंत आहेत?. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. तुम्ही लावलेलं झाडं वाचलं का ?. यापासून सुरु होईल. मात्र वन विभागाने हे काम चोख बजावले आहे. वन विभाग, वनविकास महामंडळ व काही सामाजिक संघटनांनी गेल्या वर्षी लावलेल्या झाडांपैकी 91 टक्के झाडे मित्रांनो वनात सुरक्षित आहेत. ही वस्तुस्थिती कळल्यावर मात्र अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत वृक्षारोपणानंतर
अनेकांनी त्याचे पुढे काय झाले?. याचा विचार केलाच नाही. त्यामुळे त्या सर्वांना झाड जगलीत की नाही हा प्रश्न पडला. मात्र वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व अन्य संस्थांना झाडे लावतांनाच ती जगविण्याची हमी वनमंत्र्यांनी घेतली होती आणि त्यांच्या या हमीला विश्वासाने पूर्ण करत कर्मचा-यांनी स्वत:च्या पाल्यासारखे वृक्षाची जपवणूक केली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील 4 कोटी वृक्षांची वाढ पर्यावरणात होईल आणि ही सर्व झाडे जगतील अशी खात्री बाळगुया. गेल्या काही महिन्यांपासून 4
कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पासाठी वनमंत्र्यांचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत. त्याचे नियोजनच डोळयात भरण्यासारखे असून प्रत्येक विभागात ही मोहीम आता युध्द पातळीवर राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक वनाच्छादित प्रदेश विदर्भात आहे. याठिकाणी 46 टक्के वन सुरक्षित आहे. मात्र मराठवाडा सारख्या प्रदेशात एक टक्काही वन नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त  शिवाराच्या माध्यमातून शाश्वत जलसाठयाच्या निर्मितीमागे लागले आहेत. कडक उन्हाळयात त्यांनी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला. साठवण क्षमता निर्माण करणा-या नालाखोलीकरण, विस्तारीकरण, तलाव निर्मिती, तलाव पुनरुज्जीवन या कामाची त्यांनी पाहणी केली. तथापि, शाश्वत पाणीसाठे निर्माण झाले तरी त्यात हवे असणारे पाणी येणार कुठून ? त्यासाठी वृक्षलागवडीचा रामबाण उपाय या कल्पक व दूरदुष्टीच्या वनमंत्र्यांनी सूचवला आहे. ज्याला शुध्द पाणी हवे असेल, शुध्द ऑक्सीजन हवा असेल अशा प्रत्येकाने एक झाड लावावे व त्याच्या संरक्षणाची हमी घ्यावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्तशिवाराला त्यांनी वनयुक्त शिवाराची जोड देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी 27 हजार ग्रामपंचायतीला त्यांनी साकडे घातले आहे. सोबतच महानगरलिका, नगरपालिका,नगरपंचायती, जिल्हा परिषदख्‍ कृषी विभाग यांना आवाहन करण्यात आले आहे. या कामात शेकडो स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी, वन्यजीवप्रेमी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. वृक्षलागवडीच्या माध्यमातून मुनगंटीवार अवघ्या देशाच्या पर्यावरण संतुलनाला हात घालत आहेत.  महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कोणी मंत्री आपल्या कामाचे उदिष्ठ जनतेच्या पुढे सादरकरीत आहे. आणि दरवर्षी आपले रिपोर्ट कार्ड सुध्दा जनतेपुढे मांडत आहे. हे सर्व आश्चर्यकारक आहे. गेल्या वर्षी 2 कोटी, यावर्षी 4 कोटी,पुढच्या वर्षी 13 कोटी, त्यानंतर 33 कोटी असे 50 कोटीचे उदिष्ठय त्यांनी स्वत:च स्वत:ला दिले आहे. या प्रत्येक वर्षाच्या नियोजनाची तयारी त्यांनी केली आहे. त्यासाठी प्रत्येकविभागाची बैठक त्यांनी त्या त्या विभागात जाऊन स्वत: घेतली आहे. यावर्षी वृक्षलागवडीचा आकडा फक्त ४ कोटी घेत असताना शासनाच्या विविध नर्सरीमध्ये 5 कोटीच्यावर रोपे तयार आहेत.नर्सरीमध्ये पुढील तीन वर्षाच्या उद्दिष्ठांप्रमाणे कोटयावधी रोपांची निर्मिती मोठया प्रमाणात सुरु आहे.
भारताच्या एकूण भूभागावर केवळ 11 टक्के जंगल आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण एकूण भूभागाच्या केवळ 20 टक्के आहे. त्यामुळे कधी काळी कोरडवाहू शेतीच्या या राज्यातील हमीयुक्त पावसाचे चक्र पूर्णत: कोलमडले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात हमखास 7 जूनला सुरू होणारा मृग नक्षत्राचा सार्वत्रिक पाऊस गेल्या काही वर्षात पडेनासा झाला आहे. कोरडवाहू शेतीचा यामुळे बोजवारा उडाला आहे. पश्चीम विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चीम महाराष्ट्राच्या अनेक भागात अमर्याद वृक्षतोडीने, पर्यावराणाच्या असंतुलनाने शेती धोक्यात आली आहे. या भागात शेतक-यांच्या आत्महत्यांचे देखील प्रमाण वाढले आहे. ही समस्या गडचिरोली सारख्या जिल्हयात नाही. या ठिकाणी पाणी टंचाई देखील नाही. गडचिरोली सारख्या 71 टक्के जंगल असणा-या भागात कधी टँकरचे कामही पडत नाही. जंगलाच्या संतुलनाशीवाय हे खरे नाही.कारण वनाचा ,वृक्षाचा संबंध पाण्याशी, प्राणवायुशी आहे. जिथे जंगल आहे,तिथे पाणी आहे, सुबत्ता आहे, जीवन आहे, शेतक-याच्या आयुष्यात समाधान आणि त्यांच्या गाठीशी पैसा आहे. त्यामुळे कृषीप्रधान देशासाठी वृक्षसंर्वधन
हा कळीचा मुददा आहे. पर्यावरणाचे असंतुलन ही धोक्याची सूचना केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला भेडसावणारी आहे. येणा-या काळात संपूर्ण देशाला पर्यावरणाला जपणे जीवनमरणाचा प्रश्न होणार आहे. त्यामुळेच सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रयत्नाची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. वृक्षलागवडीच्या उपक्रमाचे त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात त्यांनी कौतुक केले आहे.  कायमचा दुष्काळ, वाढते तापमान,अनिश्चीत पर्जन्यमान, जमीनीची धुप, जमीनीतील पाण्याच्या पातळीतील कमी,
तापमानातील बदल यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी वृक्षलागवड ही काळाजी गरज झाली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचे यावर्षी अनेक भागात दमदार आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमहोत्सव 2017 चे आयोजन केले आहे. ज्या प्रदेशात पाऊस दमदारपणे पडला आहे त्या सर्व ठिकाणी 1 ते 7 जुलै या काळात चार कोटी वृक्ष लावण्याचे आवाहन केले आहे. यासाठी प्रत्येक जिल्हयाला उद्दिष्टय दिले आहे. वनविभाग यामध्ये आपले दायित्व मोठया प्रमाणावर पूर्ण करणार आहे. मात्र यामध्ये सर्व ग्रामपंचायती,शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालयांचेही योगदान अपेक्षित आहे. शेताच्या
बांधावर, रस्त्यांच्या कडेवर, पाणी साठलेल्या बंधाराच्या बाजुला,गावा-शहरारातील मोकळया जागेवर,जंगलात कुठेही एक झाड लावा, असे आवाहन आहे.प्रत्येक जिल्हयातील सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षलागवडीसाठी रोपे तयार केली असून 25 जूनपासून 5 जुलैपर्यंत रोपे आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. चंद्रपूर जिल्हयाला यावर्षी 28 लाखाचे उद्दिष्टय आहे. तथापि,वन विभागाने 34 लाखाचे उद्दिष्टय घेतले आहे.महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयातील नागरिकांना वनमहोत्सवात सहभागी होवून वृक्ष लावगड करायची असेल तर त्यांना विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण, उपवनसंरक्षक वनविभाग यांच्याकडून सवलतीमध्ये रोपे मिळू शकतात.
महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 24 लक्ष आहे. प्रत्येक नारिकांनी एक झाड लावून जगवले तर वन मंत्री यांचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. त्यांचे हे मिशन उदयाच्या पिढीसाठी लाभदायी आणि पर्यावरण जपणारे आहे. एका सामाजिक कार्याला एका प्रामाणिक व्यक्तीने सुरूवात केली आहे.महाराष्ट्राने नेहमीच अशा सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. यावर्षी वसुंधरेला हिरवाकंच शालूचा पेहराव देण्यासाठी महाराष्ट्राची जनता मागे राहणार नाही. त्यामुळे 1 ते 7 जुलै या काळात.. मी वृक्षरोपण
करणारच… माझ्या स्वत:साठी, माझ्या शेतकरी बांधवासाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी, जिला आई. म्हणतो त्या धरणीमायच्या संरक्षणासाठी.. आता एकच लक्ष 4 कोटी वृक्ष.

प्रवीण टाके     जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर.