शेती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न राज्यातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करावे- राज्यपाल राव

0
14

मुंबई, दि. 11 : जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 2014 चे शेती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालक मंत्री विनोद तावडे,कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई,
पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल यावेळी म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांनी देशाच्या कृषी विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहे. कृषी विद्यापीठांपेक्षा शेतकऱ्यांनीच विविध प्रयोग आणि संशोधन करुन उत्पादनात वाढ केल्याची दिसून येते. राज्याच्या कृषी क्षेत्रात महिला शेतकरी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबरोबरच शेतीचीही जबाबदारी सांभाळताना दिसतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या निर्णयामुळे 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून 40 लाख शेतकरी कर्जमुक्त होणार आहे. शाश्वत शेती, सेंद्रीय शेती, फलोत्पादन, फूल शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राला आदर्श राज्य बनवुया, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, पुरस्कारार्थी हे राज्य शासनाचे ‘कृषीदूत’ आहे.त्यांनी राज्यभर दौरे करुन शेतकऱ्यांना आपण केलेल्या प्रयोगांचे मार्गदर्शन करावे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनव प्रयोग राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांचा फायदा कृषी उत्पादन वाढीस होईल.या माध्यमातून आपणाला कर्जमाफीतून कर्जमुक्तीकडे वाटचाल करणे सुकर होईल.ज्या भागात शेतकरी आत्महत्त्या मोठ्या प्रमाणावरआहे तेथे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषीदुतांची भूमिका बजवावी,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, मर्यादित साधन सामुग्रीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पादन वाढीसाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. राज्यात उन्नत शेती, समृद्ध शेतकरीच्या माध्यमातून प्रथमच तालुका उत्पादक वाढीचा घटक म्हणून धरला जात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादकता वाढीची उद्दिष्टे ठरविली जात आहे.पुरस्कारार्थी शेतकऱ्यांच्या प्रयोगांमुळे कृषी विकासाला चालना मिळाली आहे. पुरस्कारांमध्ये पुढील वर्षापासून भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी शेतकरी यांना धनादेश,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अमरनाथ येथे यांत्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यक्‌रम प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा औपचारीक स्वागत समारंभ रद्द करण्यात आला.यावेळी मृत यात्रेकरु व 2 पुरस्कार विजेते शेतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
विविध पुरस्कारार्थी असे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार : विश्वासराव आनंदराव पाटील रु.75,000/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : 50, 000 रुपये रोख , स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिलीप नारकर, प्रेमानंद महाजन,आनंदराव गाडेकर, मच्चिंद्र कुंभार, आनंदराव मटकर, शेषराव निखाडे, दत्तात्रय गुंडावार
जिजामाता कृषिभुषण पुरस्कार : पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये 50,000/- रोख , स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- माधुरी भोईर, सुनिता रावताळे, वैशाली पवार, विद्या रुद्राक्ष, लक्ष्मीबाई पारवेकर
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार :-पुरस्कारार्थींना रुपये 30,000/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- व्यंकट कुलकर्णी, चैताली नानोटे
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार :- पुरस्कारार्थींना रुपये 11,000/-रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-सर्वसाधारण गट-राजेंद्र पाटील, देवेंद्र राऊत, चिंधा पाटील, हिम्मतराव माळी, अंजली घुले, बाळासाहेब काकडे, रमेश जाधव, दत्तात्रय पाटील, आनंदा पाटील, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी बनकर, व्यंकटी गीते, शिवाजी कन्हेरे,धनंजय घोटाळे, रवींद्र मेटकर, सचिन सारडा, शालिग्राम चाफले, रियाज कन्नोजे, अविनाश कहाते आदिवासी गट- बाळकृष्ण पऱ्हाड, कल्पनाबाई बागुल,दिगंबर घुटे, मारोती डुकरे, झापू जामुणकर, वडू लेकामी
उद्यान पंडीत पुरस्कार : 25,000/- रु रोख,प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह.विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – प्रकाश ठाकूर, सुभाष गुंजाळ, रवींद्र पाटील, गणपत पारटे, भीमराव शेंडगे, दत्तात्रय फटांगरे, पुष्पा खुबाळकर, हिम्मतराव टप्पे
कृषी भूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार : रू.50,000/- रोख , स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – मधुकर मोहपे, नारायण चौधरी, नीता बांदल, प्रदीप निकम, बाळासाहेब जीवरख, नासरी चव्हाण, सुधाकर कुबडे, दिलीप कुलकर्णी, मानस रुरल डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार : राज्यातील कृषि विभागात काम करणाऱ्या आणि राज्याच्या कृषि क्षेत्राच्या विकासासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : विनय आवटे, प्रदीपकुमार अजमेरा, भागीनाथ गायके