जेसीआयच्या सहकार्याने महिलेला जीवनदान

0
9

गोंदिया,दि.14: तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील ४६ वर्षीय कुसुम गजभिये या महिलेच्या उपचारासाठी जेसीएस व अखिल भारतीय मानवाधिकार संगठनेने केलेल्या मदतीमुळे ४६ वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे. सदर महिला येथील गंगाबाई रुग्णालयात उपचारासाठी गेल्या १ महिन्यापासून दाखल झाली होती. मात्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले ५ ते ६ युनिट रक्त उपलब्ध होत नसल्याने शस्त्रक्रिया थांबलेली होती. आधार कार्ड, रेशन कार्ड नसलेल्या कुसूमचे कुटुंब हे गरीब असून उपचार करण्यालायक यांच्याकडे आर्थिक परिस्थिती ही नव्हती. रेशन कार्ड व आधार कार्ड नसल्याने राजीव गांधी योजनेचा लाभ ही मिळू शकत नसल्याने त्या उपचाराअभावी रुग्णालयातच असल्याची माहिती जेसीएसच्या धर्मिष्ठा सेंगर यांना मिळाली. आणि श्रीमती सेंगर यांनी मानवतेचा परिचय देत कुसूमच्या उपचारासाठी जेसीएस व मानवाधिकारच्या सहकार्याने ५ युनिट रक्त उपलब्ध करून दिल्याने शस्त्रक्रिया होऊ शकली. डॉ. सायस केंद्रे व त्यांच्या चमूने शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केल्याने आज त्या महिलेला जीवनदान मिळाले आहे.