पालकमंत्र्यांच्या हस्ते‘आपला जिल्हा‘ माहिती पुस्तिकेचे विमोचन

0
18

गोंदिया,दि.१५ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते आपला जिल्हा – गोंदिया या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या आपला जिल्हा – गोंदिया या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्ह्याचे भौगोलिक स्थान, जिल्ह्याची पार्श्वभूमी, जिल्ह्याचे वैशिष्ट्ये, तालुके, जिल्ह्यातील गावे, जिल्ह्याचा नकाशा, लोकसभा व विधानसभा मतदारसंघ, जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या तसेच शहरी व ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक, साक्षरतेचे प्रमाण, जिल्ह्यातील महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समित्या, एकूण ग्रामपंचायती, नगरपरिषद/नगर पंचायतची लोकसंख्या, जिल्ह्यातील पंचायत समिती निहाय ग्रामपंचायती व त्यांची लोकसंख्या, जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदया, जिल्ह्यातील डोंगररांगा, जिल्ह्याचे वनक्षेत्र, वन्यजीव, अभयारण्य, जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व इतर विविध महाविद्यालयाची संख्या, जिल्ह्यातील महत्वाचे सण, मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प, जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव यांची सिंचन क्षमता, कृषि क्षेत्र, उद्योग, महिला-पुरुष बचतगट, जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे, राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणाऱ्या ऐश्वर्यसंपन्न सारस पक्षाची व जिल्ह्यातील विविध तलावांवर येणाऱ्या विदेशी व स्थलांतरीत पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. ही पुस्तिका बहुरंगी असून पुस्तिकेमध्ये अत्यंत आकर्षक असे विविध छायाचित्र माहिती निहाय घेण्यात आले आहे. ही पुस्तिका अनेकांना जिल्ह्यातील विविध विषयांच्या माहितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.