भारताच्या भक्ती शर्माचा जलतरणात विक्रम

0
17

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारताची जलतरणपटू भक्ती शर्मा हिने अंटार्क्‍टिक समुद्रात एक डिग्री सेल्सियस तापमान असताना अवघ्या 52 मिनिटांत सव्वा दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पोहून पार करण्याचा नवा विक्रम केला आहे. तिने ब्रिटिश जलतरणपटू लेविस पुघ आणि अमेरिकन जलतरणपटू लिन्ने कॉक्‍स यांचा विक्रम मागे टाकला आहे. असा विक्रम करणारी भक्ती ही सर्वात तरूण आणि आशिया खंडातील पहिली मुलगी ठरली आहे.

भक्तीला मदत करणारे हिंदुस्थान झिंक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिलेश जोशी म्हणाले की, “भक्तीच्या या पराक्रमाबद्दल आम्हाला अभिमान आहे. संपूर्ण देश विशेषत: पोहण्याच्या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या विक्रमाने भारतीयांना योग्य पाठिंबा आणि संधी निर्माण झाल्यास यासारखे अनेक विक्रम निर्माण होऊ शकतील, हे सिद्ध झाले आहे.‘ भक्तीला यापूर्वी 2010 चा टेंझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार मिळाला असून ती 10 वर्षांपासून या क्रीडाप्रकाराची खेळाडू आहे. तिने या यशाबद्दल सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. तिच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भक्तीच्या या विक्रमाबद्दल तिचे अभिनंदन करत आम्हाला तिचा अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया आज (गुरुवार) फेसबुकद्वारे व्यक्त केल्या आहेत.