डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गौरवग्रंथाचे लोकार्पण रविवारी

0
31

नागपूर,दि.15- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण जयंती महोत्सावानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले असून, रविवारी १७ सप्टेंबरला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते ग्रंथाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव पुरणचंद्र मेर्शाम यांनी दिली.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सायंकाळी ६.३0 वाजता आयोजित लोकार्पण समारंभाला विशेष अतिथी म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, योजना आयोगाचे माजी सदस्य व ग्रंथाचे अतिथी संपादक डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहतील. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे राहतील. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रामुख्याने उपस्थित राहतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीचे कार्य लोकांपुढे यावे, या उद्देशाने वर्षभर मेहनत घेऊन ग्रंथनिर्मिती करण्यात आली. ग्रंथाच्या ५ हजार प्रती छापण्यात आल्या असून लोकार्पणापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)कडून ग्रंथाच्या ३ हजार प्रती अँडव्हॉन्स बुक करून ठेवण्यात आल्या आहेत. ग्रंथाची छापील किंमत ५00 रुपये असून लोकार्पणाच्या दिवशी तो ४00 रुपये सवलतीच्या दरात देण्यात येणार असल्याचेही कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. सि.प. काणे यांच्या अध्यक्षतेत ग्रंथ प्रकाशन समिती स्थापीत करण्यात आली असून, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. एस.जी. कांबळे, डॉ. रूपा कुळकर्णी, डॉ. प्रदीप आगलावे, गुलाब चिचाटे, कुलसचिव पुरणचंद्र मेर्शाम सदस्य आहेत. डॉ. मधुकर कासारे यांनी गौरवग्रंथाचे संपादकीय कार्य पाहिले. ७६२ पृष्ठाच्या ग्रंथामधून डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासाचे विविध दालने प्रतीत होत आहे. ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वलिखित लेख मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत असून, इतर लेखकांच्या तिन्ही भाषेतील लेखांचा यामध्ये समावेश आहे.
यासोबतच बाबासाहेबांचे आजपयर्ंत कुठेच प्रकाशित न झालेले दुर्मिळ छायाचित्रेही या गौरवग्रंथात आहे. गौरवग्रंथाच्या माध्यमातून एकूणच ऐतिहासिक दस्तावेज पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आले असल्याचेही मेश्राम म्हणाले. पत्रकार परिषदेला गौरवग्रंथाचे संपादक डॉ. मधुकर कासारे, डॉ. प्रदीप आगलावे, गुलाब चिचाटे, माध्यम समन्वयक श्याम धोंड आदी उपस्थित होते.