पर्यटकांनी पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त संख्येने भेटी द्याव्यात – जिल्हाधिकारी

0
8

बुलडाणा,दि.१३ : – केंद्र शासनाने 5 ते 25 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत पर्यटन पर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना देण्यात येत आहे. पर्यटन पर्वाच्या निमित्ताने लोणार व सिंदखेड राजा येथे पर्यटन पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तरी पर्यटकांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येने भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पर्यटन पर्व कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत सवई आदी उपस्थित होते.
राज्यभर पर्यटन पर्व साजरा करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सदर कार्यक्रमातंर्गत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन व एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांच्या सहकार्याने स्थानिक कला, संस्कृती, पाककृती व पर्यटन स्थळे यांची ओळख घडविण्यसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये लोणार येथील भगवानबाबा महाविद्यालयात चर्चासत्र, सिंदखेड राजा येथे पर्यटन जागृती अभियान व जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांकरीता निबंध स्पर्धेचे आयोजन यांचा समावेश आहे.
ते पुढे म्हणाले, पर्यटन स्थळांवर स्वच्छता पाळावी. तसेच प्रत्येक पर्यटकाने आपली वैयक्तिक जबाबदारी समजून पर्यटन स्थळाचे संवर्धन करावे. ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा वारसा जपावा. लोणार येथील पर्यटन स्थळी एमटीडीसीचे निवासी संकूल आहे. या संकूलाचा लाभ घेवून निसर्गाने दिलेला ठेवा जरूर पर्यटकांनी अनुभवावा. याप्रसंगी एमटीडीसीचे श्री. सवई यांनी माहिती दिली.