बौध्दिक प्रगतीसाठी वाचन तर शारिरिक स्वास्थासाठी अंडी आवश्यक-मनोजकुमार सुर्यवंशी

0
16

भंडारा,दि.१३ : :- मनाच्या व बुध्दीच्या विकासासाठी चांगले साहित्य, चांगली पुस्तके व यशस्वी महापुरुषांचे आत्मचरित्र वाचणे आवश्यक आहे तर शरिराच्या स्वास्थासाठी रोज अंडयांचे सेवन अतिशय लाभदायक आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अवांतर वाचन जाणिवपूर्वक करावे सोबतच सुदृढ आरोग्यसाठी दररोज दुध व अंडी खावे, असा मोलाचा सल्ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिला. चैतन्य विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय मानेगाव (बाजार ) येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित जागतिक अंडी दिवस व वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, गट विकास अधिकारी श्रीमती सावंत, पशुवैद्यकीय अधिकारी गुणवंत भडके, चैतन्य शिक्षण संस्थेचे सचिव वसंतराव हटवार, मुख्याध्यापिका वंदना हटवार व विविध विभागाचे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जागतिक अंडीदिनाच्या निमित्ताने जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळा व आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर माता यांना अंडी वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्य कार्यक्रम चैतन्य विद्यालयात घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अंडी व केळी वितरित करण्यात आली. आहारातील अंडयांचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे. यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना मनोजकुमार सुर्यवंशी महणाले की, विद्यार्थ्यांचे चांगले ऐकण्याचे व चांगले वाचण्याचे हेच वय आहे. वाचनामुळे मनावर आणि बुध्दीवर चांगले संस्कार होतात. केवळ मनावर चांगले संस्कार होऊन प्रगती होणार नाही तर त्यासाठी शरीर स्वास्थही आवश्यक आहे. शरीर स्वास्थासाठी चांगला आहार म्हणजेच अंडी व दुधाचे नियमित सेवन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना वर्गातच वाचनाची सवय लावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना डॉ. नितीन फुके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी रोज एक तरी अंडी आपल्या आहारात घ्यावे. ज्यामुळे शरीराला लागणारी सर्व जीवनसत्वे मिळतील. डॉ. कमलेश भंडारी यांनी दुध, अंडी व हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. शाळेतील मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात येणारअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचन प्रेरणा दिन, जागतिक अंडी दिवस यासोबतच हात धुवा दिवस सुध्दा साजरा करावा आणि तो निरंतर असावा अशी अपेक्षा गटविकास अधिकारी श्रीमती सावंत यांनी व्यक्त केली.
मानवी आहारामधील अंडयाचे महत्व :-अंडयामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्वे असतात. अंडयामध्ये प्रथिनाचा मोठा स्त्रोत असून जवळपास 6 गॅम प्रथिने आढळते. निरोगी ह्दयासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 फॅटीॲसीड अंडयामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. शरीर पोषणास आवश्यक असलेले 9 प्रकारचे ॲमिनो ॲसिड अंडयात असल्यामुळे अंडी हे परिपूर्ण आहार समजले जाते, असे पशुवैद्यकीय अधिकारी गुणवंत फडके यांनी सांगितले.
मेंदु आणि चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी पुरक पोषण घटक अंडयामध्ये आहे. दैनंदिन आहारात शिफारस केलेल्या एकूण कोलीनपैकी 20 कोलीन हे अंडयात असते. मेंदु पेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक फॉस्फोलिपीडस हे कोलीनमुळे मिळते. ट्रिप्टोफन आणि ट्रायरोसीन हे निद्रा हितकारक घटक अंडयात असतात. यात अमोनिया ॲसिड ॲन्टीऑक्टसीडंट गुणधर्म आहेत. एका अंडयामध्ये 50 मिलीग्रॅम कॅलशियम असल्यामुळे अंडयाच्या सेवनाने काही प्रमाणात कॅलशियमची कमतरता भरुन निघते, असे डॉ. भडके यांनी प्रास्ताविकात सांगितले.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शिक्षिका श्रीमती घाटे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. शाळेच्या ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुसतके वाचण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.