लालकृष्ण आडवाणी, बाबा रामदेव, अमिताभ बच्चनना मिळणार ‘पद्म’ पुरस्कार

0
3

नवी दिल्ली, दि. २३ – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अभिनेते अमिताभ बच्चन, योगगुरू रामदेव बाबा आणि अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुस्कारांची घोषणा करण्यात येते. यावेळी या यादीत एकूण १४८ जणांची नावे आहेत. लालकृष्ण आडवाणी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या दोन राजकीय नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर अभिनेता अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खानचे वडील व लेखक सलीम खान तसेच गीतकार प्रसून जोशी यांचेही यादीत नाव आहे.
बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकी टीम कप्तान सरदारा सिंग, चेस ग्रँडमास्टर शशीकिरण कृष्णन, कुस्तीपटू सुशीलकुमार व त्याचे प्रशिक्षक सत्पाल आणि माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणा-या अरुणिमा सिन्हा या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही पुरस्काराने गौरवण्यात येईल.
अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, पत्रकार रजत शर्मा, स्वप्न दासगुप्ता, हरीशंकर व्यास आणि अभिनेते प्राण ( मरणोत्तर) यांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.