धान उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या : काँग्र्रेस तालुका कमिटीने दिले तहसीलदारांना निवेदन

0
19

गोंदिया : केंद्र व राज्य शासनातील भाजपने निवडणुकीपूर्वी शेतकरी व सामान्य जनतेला अनेक आश्वासने दिलीत. परंतु सत्ता मिळताच त्यांची आश्वासने खोटी ठरली. त्यामुळे जिल्हारातील शेतकरी व सामान्य जनतेला सोबत घेवून त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाविरूद्ध मोर्चे काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांच्या नावे निवेदने देण्यात आली.

देवरी : धान उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ, वाढती महगाई यासह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना घेवून देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ३ फेब्रुवारीला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निवेदन तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.

शेतकऱ्यांच्या धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव देण्यात यावे, धान उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये बोनस देण्यात यावे, शासन स्तरावरुन देवरी येथे मंजूर करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे स्थानांतरण दुसऱ्या ठिकाणी करण्यात येवू नये, दरवर्षीप्रमाणे तेंदूपत्याचे बोनस त्वरित देण्यात यावे, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विहीर मंज़ूर करून त्वरित विद्युत जोडणी देण्यात यावे या प्रमुख मागण्या व इतर मागण्यांना घेवनू काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा येथील जि.प. क्रीडा संकुलातून प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला.

मोर्च्याचे नेतृत्व माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, जिल्हा सचिव नटवरलाल गांधी, तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेश्याम बगडिया, इंदल अरकरा, आनंद राऊत, धनराज हुकरे आदींनी केले. दरम्यान मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य भोजराज बहेकार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रास्ताविक रामटेके यांनी तर संचालन वसंत पुराम यांनी केले. मोर्चा व सभेसाठीसाठी जि.प. सदस्य संदीप भाटिया, तालुका उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, माजी सभापती भैयालाल टेंभरे, माधुरी कुंभरे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष मंदिरा वालदे, सुषमा पंधरे, अर्चना नारनवरे, माजी पं.स. सदस्य रामेश्वर बहेकार, नूतन बन्सोड, कृपासागर गोपाले, शकील कुरैशी, सुरेंद्र बन्सोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

सडक-अर्जुनी : तालुका काँग्रेस कमिटी सडक-अर्जुनीतर्फे तहसील कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा माजी आ. रामरतनबापू राऊत, माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी, काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते शेषराव गिऱ्हेपुंजे यांच्या नेतृत्वात गुरूवारी ५ फेब्रुवारीला काढण्यात आला.

शेकडो शेतकरी-शेतमजुरांचा मोर्चा एमएसईबी कार्यालय सडक अर्जुनी जवळून निघाला व आपल्या मागण्यांचे नारेबाजी करीत तहसील कार्यालयावर धडकला. मोर्च्याचे सभेत रुपांतर होवून माजी आ. रामरतन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

या वेळी मंचावर तालुका काँग्रेस अध्यक्ष निताराम देशमुख, राजेश नंदागवळी, शेषराव गिऱ्हेपुंजे, अशोक लंजे, उषा मेंढे, छाया चव्हाण, पं.स. सदस्य नीना राऊत, हिरालाल चव्हाण, केशवराव यावलकर, रमेश चुऱ्हे, राजाभाऊ गुब्रेले, युसूफ पटेल, जि.प. सदस्य जागेश्वर धनभाते, पं.स. सदस्य मधुसूदन दोनोडे, डॉ. श्रद्धा रामटेके, कल्पना गौर, शंकर डोंगरवार, अनिल राजगिरे, संजय बैस उपस्थित होते.

काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जे. उईके यांना देण्यात आले. मागण्यांमध्ये पूर्वीप्रमाणे २०० रुपये धानाला बोनस द्यावा, दोन हजार ५०० रुपये धानाला प्रतिक्विंटल भाव द्यावा, भूमी अधिगृहण कायदा रद्द करावा, रोजगार हमीची कामे सुरू करावी, श्ेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफीचा देण्यात यावा, शेतकऱ्यांची वीज जोडणी त्वरित करावी, बीपीएल कार्डधारकांना रेशनचा पुरवठा करावा व योग्य नियंत्रण ठेवावे, सडक-अर्जुनीला उपजिल्हा रुग्णालय सुरु करावे, राज्य तेल मुक्त करावे, अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार उईके यांना देण्यात आले.

संचालन अनिल राजगिरे यांनी तर आभार मधुसूदन दोनोडे यांनी मानले. यावेळी माजी आ. रामरतन राऊत राजेश नंदागवळी, केशव यावलकर, अशोक लंजे, रमेश चुऱ्हे, शेषराव गिऱ्हेपुंजे, उषा मेंढे, केशव यावलकर यांनी मार्गदर्शन केले.

तिरोडा : येथील काँग्रेस कार्यालयातून तालुका काँग्रेस कमिटीचा मोचार केंद्र व राज्य शासनाच्या विरूद्ध काढण्यात आला. यात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यावर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यासाठी निवेदन देण्यात आले.

मागण्यांमध्ये तालुक्यातील भारनियमन बंद करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या धानाला अडीच हजार ते तीन हजार रूपये भाव द्यावे, विजेचे बिल माफ करण्यात यावे, अन्न सुरक्षा योजना नियमित लागू करण्यात यावी, एपीएल धारकांना स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा पुरवठा करण्यात यावा, केरोसिनचा पुरवठा वाढविण्यात यावे, शेतकऱ्यांना मोफत विहिरी बांधून देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.

निवेदन देतेवेळी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, डॉ. योगेंद्र भगत, पी.जी. कटरे, देवेंद्र तिवारी, जगदीश येरोला, रमेश पटले, उदेलाल दहीकर, महिला अध्यक्ष पूनम रहांगडाले, उर्मिला रहांगडाले, मजित सवारे, प्रा. विलास मेश्राम, मानिक झंझाळ, जमईवार, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.