घोषणाबाज सरकारचे १०० दिवस-माणिकराव ठाकरे

0
15

मुंबई- राज्यात सत्तेवर येऊन १०० दिवस झालेले भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार असल्याची जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. या सरकारने १०० दिवसांतच राज्याला अधोगतीकडे नेले आहे.
या सरकारने जनतेची कशी दिशाभूल आणि फसवणूक केली त्याची पोलखोल करणारी पुस्तिका काँग्रेसने गांधीभवनमध्ये शुक्रवारी प्रकाशित केली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री रवी पाटील उपस्थित होते.
दरम्यान, राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात कॉँग्रेसतर्फे रास्तारोको केला जाणार आहे.
सत्तेवर आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत या सरकारने जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत. राज्यात टोल माफीची घोषणा करण्याचे आश्वासन दिले, मात्र ते पाळले नाही. त्याउलट खारघरचा टोल सुरू केला. व्यापा-यांची मते घेण्यासाठी एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले.
प्रत्यक्षात काहीच झाले नाही. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी होरपळला जात आहे. त्यात सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील एकही पैसा मिळालेला नाही. केंद्रानेही मदत दिलेली नाही. गेल्या तीन महिन्यात राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. धनगर, मुस्लिम आणि मराठा आरक्षणाबाबत चालढकल सुरू असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
शिव स्मारक, आंबेडकर स्मारकाबाबत घोषणा केल्या जात आहेत. पण अजूनही ठोस निर्णय घेतले नाहीत. मुंबईचा स्वाभिमान गहाण ठेवून त्याचे महत्व जाणीवपूर्वककमी केले जात आहे. हे सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. हे सरकार गोंधळलेले आणि दिशाहीन आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
या सरकारच्या काळात शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. भाजपा विरोधात असताना तेव्हा त्यांनी काँग्रेस सरकार विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. आता ही मागणी त्यांनी पूर्ण करून खुनाचा गुन्हा स्वत: सरकारवर दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कामगार कायद्यात बदल, नदी नियंत्रण क्षेत्रात बदल कशासाठी आणि कुणासाठी केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कायद्या आणि सुव्यस्थेची स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री दोन नंबरचा पैसा घेतात असा आरोप होतानाही मुख्यमंत्री गप्प आहेत. फडणवीसांचे मंत्रीमंडळही गोंधळलेले आहे. स्वत: मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.