मराठी संत साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी स्पर्धा

0
143

• 13 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी
• विजेत्यांना मिळणार बक्षिसे देणार
गोंदिया,दि.12 : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त वतीने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान 7 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संत साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी भव्य ग्रंथ दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता संत चोखोबानगर, जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी/मोरगाव या संमेलनस्थळी करण्यात येणार आहे. दिंडीचा मार्ग दुर्गा चौक ते जिल्हा परिषद शाळा असा राहणार आहे.
ग्रंथ दिंडी स्पर्धेत प्रथम बक्षीस 31 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 21 हजार रुपये, तृतीय बक्षिस 11 हजार रुपये व काहींना उत्तेजनार्थ 5 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे. ग्रंथ दिंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व पुरुषांनी पांढऱ्या पोषाखात असावे. टाळ, मृदंग, वीणा व इतर साहित्य सोबत आणावे. प्रत्येक दिंडीमध्ये किमान 30 किंवा त्यापेक्षा जास्त वारकरी असावे. दिंडी स्पर्धेत ड्रेसकोड, शिस्त, रचना, सांप्रदायिक चाल, संतांचे अभंग, स्वर-ताल, पावली, ठेका याबाबींचा विचार करुनच बक्षिसाचे मानकरी ठरणार आहे. दिंडी परिक्षकाचा निर्णय हा अंतिम राहील. स्पर्धेत शिस्तपालन करण्याकरीता चोपदार व शिपाई दिंडी मंडळाने सोबत आणावे. दिंडीमध्ये ध्वनीक्षेपक मर्यादीत आवाजातच ठेवावा. पालखी दुर्गा चौक ते जिल्हा परिषद शाळा या मार्गावरच नंबर काढले जातील. संमेलनाच्या समारोपाच्यावेळी स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात येईल. जर समान गुण मिळाले तर ते बक्षिस विभागून देण्यात येईल. ज्या दिंडींनी आपल्या नावाची नोंद केली आहे त्यांना संमेलनाच्या तिनही दिवस उपस्थित राहावे लागेल. अन्यथा उपस्थित न राहिल्यास गुण कमी करण्यात येईल. 13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी. दिंडीमध्ये सहभागी होणारे व संमेलनासाठी येणाऱ्या सर्व लोकांची निवास, भोजन व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रंथ दिंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूंनी मंजुषा तरोणे (9834966573), गीता ब्राम्हणकर (9404042207) व गोपीनाथ दरवळे (9637000299) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन संत साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडी स्पर्धेच्या समन्वय समितीने केले आहे.