डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर 14 एप्रिलपूर्वी खरेदी करणार

0
18

नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील वास्तव्य असलेले घर 14 एप्रिल पूर्वी खरेदी करण्यात येईल अशी माहिती सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी काल दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1921-22 या कालावधीत लंडन येथे ज्या घरात वास्तव्य करीत होते ते घर महाराष्ट्र शासनाच्यावतीने खरेदी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. हे घर खरेदी करण्याची केंद्र शासन स्तरावरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात काल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालययेथे तयार करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, अभ्यासिका या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.हे घर खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या सुमारे 40 कोटींच्या निधीची तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे. भारताचे लंडन येथील उच्चायुक्त श्री रंजन मथाई यांच्या समवेत बैठक होणार असून या बैठकीत कायदेशीर बाबींवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, असे श्री बडोले यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविले जाते. विद्यार्थ्यांसाठी या वास्तूचा उपयोग होणार आहे असे नमूद करून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, केंद्र शासनकडून घर खरेदी करण्याच्या प्रक्रीयेस लवकरच मंजूरी मिळेल. देशाच्या दृष्टीने लंडन येथील हे घर प्रेरणादायी ठरेल.

या पत्रकार परिषदेला माजी समाज कल्याण आयुक्त आर.के. गायकवाड, उपसचिव सामाजिक न्याय विभाग डी.आर. डिंगळे आणि उप-महाव्यवस्थापक रमेश कटके हे उपस्थित होते.