आर आर पाटील यांचे दु:खद निधन

0
13

मुंबई – गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कर्करोगाशी झुंजणारे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आर आर पाटील (आबा) यांचे आज (सोमवार) वयाच्या 58 व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. पाटील यांच्यावर मुंबईमधील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. पाटील यांच्यामागे पत्नी व दोन अपत्ये असा परिवार आहे.

पाटील यांना तोंडाच्या कर्करोगामुळे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे संवेदनशील नेतृत्व अशी पाटील यांची ओळख होती. दरम्यान, पाटील यांच्या निधनामुळे राज्यभरामधून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रवादीसह इतरही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या वृत्तामुळे दु:खद भावना व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक असलेल्या पाटील यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी प्रदीर्घ होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पाटील यांचा त्यांच्या पक्षाशिवाय इतरही राजकीय पक्षांमधील नेत्यांशी उत्तम स्नेह होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अरुण गुजराती, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भाजप नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांसह इतरही अनेक राजकीय नेत्यांनी पाटील यांना दु:खद शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

पाटील यांचे पार्थिव राष्ट्रवादी भवनामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून; त्यांच्यावर त्यांच्या जन्मगावी तासगाव (अंजनी) येथे उद्या (मंगळवार) दुपारी अत्यसंस्कार केले जाणार आहेत