बारावी परिक्षेची उत्तरपत्रिका 20 मिनिटे तर प्रश्नपत्रिका 10 मिनिटे आधी मिळणार

0
16

पुणे- महोत्सवी कार्यक्रमात मंत्रीमहोदयांनी घोषणा करणे आणि ती अल्पावधीत प्रत्यक्षात येणे, ही गोष्ट दुर्मिळच. मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडले आहे. घोषणा वाऱ्यावर विरून न जाता, विद्यार्थीहिताची असल्याने मंडळाला त्याची दखल घ्यावी लागली आणि पन्नास वर्षांत प्रथमच मंडळाने आपली कार्यपद्धती बदलली. परिणामी बोर्डाच्या परीक्षेच्या टेन्शनने आधीच धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तब्बल दहा मिनिटे तर उत्तरपत्रिका २० मिनिटे आधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात येत आहे. राज्यभरात २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेपासूनच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पेपरच्या वेळेआधीच देण्याचा निर्णय अमलात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा ऐतिहासिक ठरणार आहे.

हे आहेत फायदे
प्रश्नपत्रिका संपूर्णपणे सावकाश वाचणे, त्यातील सोपे व अवघड प्रश्न समजून घेणे, सोपे प्रश्न आधी सोडवण्याचा निर्णय घेणे, त्याचवेळी मनात कठीण वाटणाऱ्या प्रश्नांचाही शोध सुरू ठेवणे, लेखनाचा वेग जपणे, वेळेचे भान ठेवणे..अशा अनेक गोष्टी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात एकाचवेळी असतात. हा ताण हलका व्हावा आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्म वाचन प्रत्यक्ष पेपरच्या वेळेआधीच करण्याची संधी मिळावी, हा हेतू यामागे आहे.