पर्यावरणाच्या समस्या आणि भविष्यातील धोके

0
206
◆जमिनीचा कस नष्ट झाल्याने अन्नधान्याचे उत्पादनच थांबणार
 ◆भविष्यात सुजलाम सुफलाम भाग वाळवंट
◆उत्पन्नासाठी नैसर्गिक जंगलांचा बळी
नितीन लिल्हारे ●
मोहाडी,दि.30 :  आज जगासमोर सगळ्यात मोठ संकट कोणतं असेल, तर ते आहे पर्यावरण प्रदूषण. सूर्य मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक पर्यावरण प्रदूषणामुळे पूथ्वीचे कधी न भरून होणारे नुकसान होत आहे.
बेसुमार लोकसंख्यावाढीमुळे पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांवर ताण वाढत चाललेला आहे, मानवाला अन्न, पाणी इंधन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेती व राहण्यासाठी सुयोग्य जमीन या सगळ्यांचा वापर व गरजा सतत वाढत आहे. पृथ्वीची संसाधनं कमी पडू लागली की मग पृथ्वीचं गैरमार्गाने सर्रास शोषण होऊ लागते, वाढत्या लोकसंख्येमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. शिक्षणाच्या सोयी कमी पडू लागल्या की पर्यावरण प्रबोधन करणं अवघड होते, सरकार वाढणारी लोकसंख्या आणि तिच्या गरजा दोन्ही रोखण्यासाठी असमर्थ ठरल्या आहेत. वायू, जल, मृदा तसेच इतर प्रदुषणवाढीवर कोणाचाच वचक राहत नाही. जर वाढत्या लोकसंख्येला आपण आज आत्ताच लगाम घातला नाही, तर आपल्या  गरजा पुरवता पुरवता उद्या पृथ्वीवरची सगळी संसाधनं संपून जातील. मागील काही दशकांपासून मानवाकडून चाललेलं पृथ्वीचं शोषण आणि वातारणाची अवनती आता धोक्याची पातळी ओलंडली आहे. भुकंप, पूर, सुनामी, वादळे या सारख्या नैसर्गिक आपदांना वारंवार आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. निसर्गमित्र व संस्था पृथ्वीच्या या दुर्दशेबद्दल जगभरात लोकांना अवगत व शिक्षित करण्याचा आप-आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण आता पृथ्वीसमोरील भविष्यातील धोकेच एवढे वाढले आहेत की, जगभरातील सर्व निसर्गमित्र व संस्था एकत्र केल्या तरी देखील सर्व लोकसंख्येला शिक्षित करायला कमी पडतील.
हवा, पाणी आणि मातीचं प्रदुषणामुळे होणारं नुकसान भरून निघण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. जड धातू, नायट्रेटस आणि प्लॅस्टिक हे पृथ्वीसाठी अक्षरक्ष: विष आहेत. तेलाचे तवंग, आम्लयुक्त पाऊस, व नागरी अव्यवस्थेमुळे पाणी दुषित होते आहे. उद्योगधंदे, उत्पादन केंद्रे आणि जैविक इंधनांच्या ज्वलनाने प्रचंड वायू प्रदुषण निर्माण होतात. स्वच्छ पिण्याचे पाणी एक असामान्य गोष्ट बनत चालली आहे. पाणी ही अपरिहार्य मानवी गरज आहे. म्हणून पाण्याचे दुर्भिक्ष्य आर्थिक आणि राजकीय चिंता बनत चालली आहे.
हवामान बदलामुळे देश-प्रदेश पुर्णपणे उद्ध्वस्त झाल्यास सुजलाम सुफलाम भाग वाळवंट व समुद्र भाग वाळवंट होऊ शकतात?  सध्या इमारतीसाठी लाकूड पुरवणाऱ्या वनक्षेत्राने पृथ्वीचा 30% भूभाग व्यापला आहे. पण नागरीकरणाच्या गरजा पुरवण्यासाठी असलेली राक्षसी लाकडांची गरज भागवण्यासाठी नियमितपणे केल्या जात असलेल्या लाकूडतोडीने हे वृक्षाच्छादित वनक्षेत्र फार जलद गतीने कमी होत आहे. कारण लोक घरे, अन्न आणि इतर साहित्याच्या गरजा भागवण्यासाठी बेसुमार जंगलतोड करत आहेत काही काही ठिकाणी रबरासारख्या चांगले उत्पन्न मिळवून देणारी कृत्रिम शेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी नैसर्गिक जंगलांचा मोठ्या प्रमाणात बळी घेतला जात आहे. जंगलतोड एक प्रचंड समस्या आहे. जोपर्यंत त्यातून काही वाईट निष्पन्न होत नाही तोपर्यंत चालूच राहिल. पृथ्वीवरची सगळी जंगलं नष्ट झाली की शेवटी पृथ्वी हेच एक मोठे वाळवंट होईल.त्यामुळे आपल्या प्रकृतीला पण गंभीर धोके निर्माण होईल.
पृथ्वीवरील मोठ्या प्रमाणावरी सार्वजनिक अस्वच्छता व अनारोग्य ही देखील एक मानवी अस्तित्वासाठी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वीवरील कित्येक जीवजंतू व वनस्पतींच्या प्रजाती पृथ्वीवरून वेगाने नष्ट होत आहेत. त्याचप्रमाणे पोषक आहाराची कमी, प्रचंड प्रमाणात शिकार व शोषण तसेच निसर्गातील मानवी ढवळाढवळीमुळे पसरणारे निरनिराळे विषाणू यामुळे देखील पृथ्वीवरील प्रजाती नाश पावत आहेत. सजीव प्रजाती याच गतीने नष्ट होत राहिल्यास निसर्गचक्राचा समतोल ढळेल व मानवी अस्तित्वालाच त्याचा धोका निर्माण होईल. आजच्या आधुनिक शेतीच्या काळात शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी भरमसाठ कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर केला जातो. यातली काही रासायनिक द्रव्ये
फवारल्यानंतर पुर्णपणे नष्ट होत नाहीत व जमिनीमध्ये झिरपून वनस्पती आणि पिकांना गंभीर हानी पोहचवतात. विषारी बनवतात. त्याचबरोबर कारखान्यातले रासायनिक व इतर मानवी मलमिश्रित दुषित पाणी देखील काही ठिकाणी भाजीपाला पिकवण्यासाठी नाईलाजाने किंवा कळूनसवरून वापरले जाते. या दुषित पाण्यामुळे मानवी आरोग्याला अपायकारक विषारी द्रव्ये खाण्याच्या पदार्थामध्ये मिसळतात व मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. रासायनिक व दुषित पद्धतीने केली जाणारी आधुनिक शेती थांबवून तातडीने जर आपण आजच पारंपारिक निसर्गपुरक शेतीकडे वळालो नाही, तर उद्या जमिनीचा कस पुर्णपणे नष्ट झाल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादनच होणार नाही व आपल्या प्रचंड लोकसंख्येला एक दिवस भुकेने उपाशी मरण्याची वेळ येईल, एवढे निश्चित.