आत्मसमर्पणातून आत्तापर्यंत ४७९ नक्षल्यांना मिळाले जीवन

0
17

 गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा समावेश
 गत दोन वर्षांत ८५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
 स्पेशल झोनल कमिटी सदस्यासह ६ डिव्हीसी व १६ कमांडर मुख्य प्रवाहात
नागपूर, दि. २१ – नैसगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधव व गरीब जनतेच्या मागासलेपणाचा फायदा घेत व अनेक भूलथापा देत नक्षल्यांनी त्यांना नक्षल चळवळीत ओढले. या चळवळीत आपले भवितव्य नसून केवळ आपला नक्षल्यांकडून वापर करण्यात येत आहे, तसेच जिवालाही धोका असल्याची बाब चळवळीत गेलेल्या युवक-युवतींना पोलिसांनी पटवून दिल्यामुळे त्यांनी शासनापूढे आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ४६० नक्षलवाद्यांसह राज्यातील गोंदिया १७, चंद्रपूर १ व यवतमाळ १ अशा एकूण ४७९ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. विशेष म्हणजे गत दोन वर्षांत तब्बल ८५ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य आणि १६ कमांडरसुध्दा मुख्य प्रवहात आले आहेत. योजनेचे यश पाहता राज्य्‍ शासनाने आत्मसमर्पण योजनेला २८ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी गृह विभागाने २९ ऑगस्ट २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. नक्षलवादी खोट्या भुलथापा देऊन भोळ्या भाबळ्या आदिवासींची केवळ दिशाभूल करीत आहेत, ही बाब पटवून देण्यात पोलिसांनाही यश आले आहे. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण १० टप्प्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ४७९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये १ स्टेट झोनल कमेटी सदस्य, ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १६ कमांडर, २३ उपकमांडर, २०४ दलम सदस्य, १०५ क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२४ संगम सदस्य यांचा समावेश आहे. सन २००८-२००९ या चवथ्या टप्प्यात सर्वाधिक १४४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. योजना सुरु झाल्यानंतर लगेच एका महिन्यात म्हणजे २५ सप्टेंबर २००५ रोजी नक्षली चळवळीत दलम सदस्य असलेला जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याच्या आत्मसमर्पणाने योजनेला पहिले यश प्राप्त झाले.
सन २००५-२००६ या वर्षात एकूण ५ दलम सदस्य, ५ क्षेत्रीय/ ग्रामरक्षक दल सदस्य, ६१ संगम सदस्य अशा एकूण ७१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून नवजिवनाची वाट धरली. सन २००६-२००७ या वर्षात ३ उपकमांडर २२ दलम सदस्य, ९ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ३२ संगम सदस्य अशा एकूण ६६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २००७-२००८ या वर्षात गडचिरोली जिल्हातील १ कमांडर, १ उपकमांडर, २३ दलम सदस्य, ७ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ७ संगम सदस्य अशा एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २००८-२००९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ४ कमांडर, ५ उपकमांडर, ३४ दलम सदस्य, ७६ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, २४ संगम सदस्य अशा एकूण १४४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

सन २००९-२०१० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात स्टेट झोनल कमेटी सदस्य रैना उर्फ रघू उर्फ जालमलाय लालुसाय सडमेक याने आत्मसमर्पण केल्यामुळे पोलिसांना फार मोठे यश प्राप्त झाले. या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १ स्टेट झोनल कमेटी सदस्य, १ कमांडर, १० दलम सदस्य असे एकूण १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१०-२०११ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १८ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा २१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०११-२०१२ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, १० दलम सदस्य, ३ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१२-२०१३ या वर्षात ३ कमांडर, २ उपकमांडर, १० दलम सदस्य, १ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य असे १६ नक्षलवादी मुख्य प्रवाहात आले. सन २०१३ या वर्षात ३ डिव्हीजनल कमांडर, १ कमांडर, ३ उपकमांडर, ४० दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१४ मध्ये १ डिव्हीजनल कमांडर, ३ कमांडर, ६ उपकमांडर, ३० दलम सदस्य अशा एकूण ४० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तर ३१ जानेवारी २०१५ पर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर २ दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
२०१३ च्या नवव्या टप्प्यात सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले, हे विशेष. नक्षल चळवळीत राहून काम करणे जिवासाठी धोकादायक असल्याची बाब लक्षात आल्यावर आतापर्यंत नक्षल चळवळीत पती-पत्नी म्हणून काम करणा-या एकूण ३० जोडप्यांनीही या योजनेंतर्गत आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी वाहन प्रशिक्षण संस्थेमधून वाहन चालकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालविण्याचे परवाने देण्यात आले आहेत. आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनासुध्दा शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काहींना इलेक्ट्रीक फिटींग, नळ फिटींगचे प्रशिक्षण (प्लम्बींग) तर काही आत्मसमर्पित बटई पध्दतीने शेतीचे कामे करीत आहेत. आत्मसमर्पित सदस्यांना विविध प्रशिक्षणाच्या आधारावर कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे. काही सदस्य पोलिस विभागामध्ये विशेष पोलिस अधिकारी म्हणून, तर काही पोलिस विभागात रोजंदारीची कामे करीत आहेत. याशिवाय काही सदस्यांनी सायकल दुरूस्ती केंद्र, पान टपरी, चहा टपरी व भाजी विक्री केंद्र सुरू करून रोजगार मिळविला आहे.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्याची हमी शासनाने घेतल्याने नक्षल चळवळीतील अनेक जण आत्मसमर्पणाकडे वळत आहे. जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात यावा, यासाठी गडचिरोली पोलिसांनी वेगवेगळ्या रणनितीचा वापर सुरू केला आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याला घर किंवा घरासाठी भुखंड आणि आर्थिक मदत देण्यात येत आहे. व्यवसाय उभारणीसाठी बँकांचे अर्थसहाय्य, शेती करण्यासाठी बैलजोडी, बैलबंडी, डिझेल इंजीन आदी सुविधा देण्यात येत आहे. नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून जबाबदार नागरिक बनविण्यासाठी पोलिसांद्वारे आत्मसमर्पण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे आत्मसमर्पण योजनेला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले आहे.