काँग्रेसमधील गळती रोखण्याची जबाबदारी राणेंकडे

0
10

मुंबई- लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण उडाल्यानंतर बिथरलेले पक्षातील नेते भाजप-शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. नवी मुंबईतील महापालिकेच्या निवडणुका दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या तेथे सध्या पक्षांतर जोरात सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते, नगरसेवक भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात होणारी गळती रोखण्यासाठी दोन्ही पक्षाने कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे तर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आज नवी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांचा क्लास घेणार आहेत. पालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्याबरोबरच काँग्रेसला उभारी देण्यासाठी राणेंचा प्रयत्न असेल तर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात कायम ठेवण्यासाठी गणेश नाईक कार्यकर्त्यांचे प्रबोधन करतील. दरम्यान, गणेश नाईक राष्ट्रवादीतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. गेली दोन-तीन महिने नाईक कधी भाजपात तर कधी शिवसेनेत जाणार अशा वावड्या उडत होत्या.
नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्याच्या मध्यात होत आहे. यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तयारीला जोरदार वेग आला आहे. असे असले तरी नवी मुंबईतील सहा नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. बेलापूरमधील काँग्रेसचे बडे नेते नामदेव भगत यांनीही सेनेत प्रवेश केला आहे. पक्षाचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत.