येरमनारवासीयांच्या सहकार्याने साकारतोय भीम सेतू

0
11

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.03ः- विकास कामांमुळेच नक्षलवाद संपणार या भूमिकेतून भुमकाल संघटनेने अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील येरमनार गावालगत असलेल्या मोठ्या नाल्यावर 200फूट लांब पुल बांधण्याचे काम आव्हान म्हणून हाती घेतले होते. या नाल्यामुळे 10-12 गावातील चार ते पाच हजार लोकसंख्या बाधित होत असते. त्यामुळे हा पूल होणे महत्त्वाचे आहे.
मात्र गावातील सामान्य लोक कामावर येणार किंवा नाही ही शंका होती.नोव्हेबर 2017 मध्ये येरामणार गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश रामटेकेयाची नक्षलवाद्यांनी निर्घृणपणे मारून टाकल्यामुळे प्रस्तावित पुलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तरीपण काम करण्याचे संघटनेने जिद्दीने ठरवले.एप्रिलच्या शेवटी बोरिया-कासनासुर येथे झालेल्या नक्षल चकमकीमुळे दुर्गम भागात तणाव असल्याने काम होऊ शकेल की नाही असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.तरीसुद्धा धोका पत्करत 19 मे रोजी काम सुरू झाले. उद्घाटन समारोह करिता पाच ते सहा गावातील नागरिक बोलावले गेले होते. त्यात येरामनार गावासह आजू बाजूच्या गावातील सर्व समाजाच्या लोकांनी हजेरी लावली होती. तसेच निर्माण कार्यालासुद्धा सुरुवात होण्याच्या दिवसापासून, ह्या भागातील सगळ्यांनीच मोठ्या संख्येने कामाला हजेरी लावून मोठी गती आणली. ह्या काळात या विविध समाजसेवी संघटनानी बांधकाम स्थळी भेट देऊन भूमकाल संघटनेची हिम्मत वाढवली.कोणतीही विपरीत घटना होवू नये म्हणून गडचिरोली पोलीस विभागाने डोळ्यात अंजन घालून चोख सुरक्षा ठेवली. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सतत कामाचे मनोबल वाढवायला सहकार्य केले.

या काळात अनेक अडचणी उभ्या असल्या तरी काम पूर्णत्वास जात आहे. यापुढे कुणा गावकर्याचा जीव जावू नये, कुणी आरोग्य, शिक्षण, शासकीय कामासाठी अडू नये म्हणून भुमकाल संघटनेने हे काम लोकसहभागातून हाती घेतले असून लोकांनी  लोकांकडून लोकांसाठी बांधलेले संबध या पुलाच्या माध्यमातून जोडले जाणार असल्याची माहिती भूमकाल संघटनेचे सचिव प्रा. श्रीकांत भोवते यांनी दिली आहे.