स्वाइन फ्लुचा धोका वाढण्याची शक्यता,विदर्भात पावसाच्या सरी

0
10

नागपूर – पाकिस्तान आणि कच्छमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्‌टा विदर्भाच्या दिशेने सरकल्याने नागपूरसह अनेक शहरांमध्ये शनिवारी व रविवारी पावसाच्या सरी कोसळल्या. विदर्भात पुढील दोन दिवसातही गारपिटीसह पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या वैदर्भींना दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो आहे. शनिवारी अचानक ढग दाटून आले अन सायंकाळी शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला. शिवाय कमाल व किमान तापमानातही घट झाली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंत शहरात दहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात यवतमाळ येथे सर्वाधिक म्हणजेच 53.8 मिलीमीटर पाऊस पडला. याशिवाय अमरावती येथे (36.4 मिलीमीटर), वर्धा (24.4 मिलीमीटर), अकोला (17.8 मिलीमीटर) आणि बुलडाणा (14 मिलीमीटर) येथेही चांगला पाऊस झाला. हवामान खात्याने रविवार व सोमवारीही पूर्व व पश्‍चिम विदर्भात गारपीटीची शक्‍यता वर्तविली आहे.
हा पाऊस जर सुरुच राहिला तर देशभरात स्वाइन फ्लुच्या धोक्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हवमानात अचानक बदल होण्याची कारणे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारताव्यतिरिक्त पाकिस्तानच्या काही भागांमध्येही पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच डोंगराळ भागात थंडी वाढण्याची चिन्हे आहेत. पावसाबरोबरच उत्तर मध्य भारतात हवेचा वेग वाढलेला असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशवर या वाऱ्यांचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. दिल्लीत सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागांमध्ये आगामी आठवडाभरही पाऊस होण्याची शक्यता आहे. याठिकाणी 50 ते 100 मि.मि. पाऊस होण्याची शक्यता आहे.

स्वाइन फ्लूचा धोका वाढणार
उत्तर आणि मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता असल्याने आगामी काळात स्वाइन फ्लुचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर असेच हवामान राहिले तर स्वाइन फ्लुचा धोका आणखी वाढण्याची शक्यचा निर्माण झाली आहे.