डॉ. साळुंखे यांना पोलिस संरक्षण

0
10

सातारा -ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना सातारा पोलिस दलाकडून पोलिस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख यांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर विचारवंताना असलेला धोका प्रकर्षाने समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून काही विचारवंतांना पोलिस संरक्षण असले पाहिजे, असा शुद्ध हेतू समोर ठेवून जिल्हा पोलिस प्रमुख देशमुख यांनी साळुंखे यांना पोलिस संरक्षण दिले आहे. दरम्यान, साताऱ्यात दाभोलकर कुटुंबीय व आ. ह. साळुंखे यांच्या व्यतिरिक्त अद्याप इतर कोणालाही पोलिस संरक्षण देण्यात आले नाही.

पानसरेंच्या हत्येचा तपास योग्य दिशेने

कोल्हापूर: ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे प्रशस्तीपत्रक पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी कोल्हापूर पोलिसांना दिले. येत्या काही दिवसांत काही ठोस धागेदोरे हाती लागतील, असा आशावाद व्यक्त करताना ‘विशिष्ट’ कारणांचा तपास बंद केलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. बॅलेस्टिक रिपोर्ट प्राप्त झालेला नाही…, उमा पानसरे यांच्या जबाबानंतर संशयितांची रेखाचित्रे पूर्ण होतील, असे खुलासे करून त्यांनी अप्रत्यक्षरित्या तपासात प्रगतीच नसल्याची कबुली दिली.

पानसरे यांची हत्या होऊन पंधरा दिवस उलटले आहेत. दयाळ मंगळवारी तातडीने कोल्हापुरात आले. त्यांनी मंगळवारी आणि बुधवारी सकाळी तपास पथके व अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. हल्ल्याच्या तपासासाठी २५ पथकाबरोबर पुणे शहर आणि कोकण परिक्षेत्रातील अधिकारी तपास करत असल्याचे पुन्हा सांगितले. उमा पानसरे या सर्वांत महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. त्यांच्याकडून हल्लेखोरांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. संशयितांची रेखाचित्रे तयार केली असली तरी उमा पानसरे यांना चित्रे दाखवून त्यांची खातरजमा केल्यानंतरच रेखाचित्रे प्रसिध्द करणार आहोत. पोलिसांनी नागरिकांचे जबाब घेतले असले तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाले नसल्याची कबुली दयाळ यांनी दिली.