भंडारा येथे प्रदर्शित होणार ‘हौसला और रास्ते’

0
19

भंडारा,दि.24ः- जिल्ह्यातील युवकांनी देशभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध भागातील लोकांना एकत्र करत “हौसला और रास्ते” हा लघुपट साकारला. सदर चित्रपट २७ डिसेंबर २०१८ रोज गुरुवारला साखरकर सभागृह, वरठी रोड भंडारा येथे प्रदर्शित होणार आहे. गेले अनेक दिवस जिल्हावासियांना या क्षणाची उत्कंठा लागून होती तो क्षण आता जवळ आला आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांचा सत्कार देखील याप्रसंगी आयोजित केला आहे.
यापूर्वी हा लघुचित्रपट फ़्रांस येथील मेडिटेरियन कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखवला गेला. या दोन्ही महोत्सवात ‘हौसला और रास्ते’ या चित्रपटाला “बेस्ट फर्स्टटाइम फ़िल्ममेकर्स’ आणि “स्पेशल फेस्टिवल मेंशन” म्हणून गौरव करण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या या ज्वलंत विषयावर हा लघुचित्रपट तयार केलेला आहे.
या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी तथा संगीत दिग्दर्शन प्रशांत चव्हाण (मुंबई) यांनी केले आहे. अक्षित रोहडा (गुजरात) यांनी सहाय्यक सिनेमेटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे. प्रशांत वाघाये सहनिर्माता आहेत तर योगेश भोंडेकर कार्यकारी निर्माता आहेत आणि इंस्ट्रक्टर इमरान शेख आहेत. गुजरातचे अभिनेते मौलिक चव्हाण, हिमांशी कावळे प्रमुख भुमीकेत आहेत तसेच संजय वनवे, अतुल भांडारकर, अंजली भांडारकर, सुरेश जोशी, सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका देखील या चित्रपटात आहेत.
या चित्रपट प्रदर्शनाला जिल्ह्यातील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चित्रपट निर्माता चेतन भैरम, दिग्दर्शक रोशन भोंडेकर, सहनिर्माता प्रशांत वाघाये, संजय वनवे, इमरान शेख यांनी केले आहे.