ठेवीदार संरक्षण कायद्यात बदल करण्याचा शासनाचा विचार- मुख्यमंत्री

0
11

विधानसभा प्रश्नोत्तरे :

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सापळ्यात अडकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत. या विभागाच्या सापळ्यात अडकलेले जे अधिकारी/कर्मचारी अजूनही सेवेत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगररचनाकार यांना लाच स्वीकारताना अटक केल्याबाबतचा प्रश्न सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, राजेंद्र पाटणे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
राज्यात ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायदा अंमलात असून त्यानुसार ‘पर्ल्स कंपनी’मधील गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच नागरिकांची विविध मार्गाद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर प्रतिबंध घालण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायद्यामध्ये बदल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी ‘पर्ल्स कंपनी’मध्ये गुंतवणूकदार म्हणून काम करीत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य डॉ. सुजित मिणचेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.सदस्य राजेश क्षीरसागर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र निर्भया पथक- मुख्यमंत्री
मुंबईत उपनगरी प्रवास करणाऱ्या महिलांवरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. हे लक्षात घेता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे पोलीस दल व रेल्वे सुरक्षा बल यांच्यात अधिक समन्वय साधण्यासाठी सूचना देण्यात येईल. शिवाय महिला पोलिसांचे स्वतंत्र निर्भया पथकही स्थापन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
मुंबईतील उपनगरी प्रवास करणाऱ्या महिलांवरील हल्ल्यांच्या गुन्ह्यात वाढ झाल्याबाबतचा प्रश्न अमित देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या महिला डब्यामध्ये पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी नेमले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष निर्माण करण्यात आला असून त्याचा क्रमांक 9833331111 हा आहे.सदस्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, वर्षा गायकवाड, मनीषा चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.