युवा एकता समितीतर्फे पक्ष्यांसाठी पाण्याची सोय

0
29
गोंदिया,दि.23 : तापमानाचा पारा वाढत आहे. अशात पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही पाण्याची चणचण भासत आहे. दरम्यान पशुपक्ष्यांना पाण्याअभाची जीवास मुकावे लागते. त्यामुळे पक्षीप्रेमींकडून पक्ष्यांसाठी त्या-त्या ठिकाणी पाण्याची सोय केली जाते. याच अनुषंगाने पक्षी प्रेम जोपासत युवा एकता समिती शास्त्री वॉर्डच्या पदाधिकार्‍यांनी पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी परिसरातील वृक्षांवर कृत्रिम जलकुंडाच्या माध्यमातून पाण्याची सोय करून देण्यात आली.
प्रचंड उन्हाच्या पार्श्वभुमीवर पक्ष्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने पक्षी मिळेल तेथे पाणी पिताना दिसतात. अगदी नवीन इमारतींच्या स्लॅबवर साठवलेल्या पाण्यात डुबकी मारून गारवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी सोशल मीडियातूनही आवाहन केले जात आहे. पक्षु-पक्ष्यांबद्दल जिव्हाळा आणि आस्था असणारे जागा मिळेल तेथे पाण्याची सोय करत आहेत. स्लॅबवर, गच्चीत, अंगणात, झाडावर पाण्याची सोय करून धान्यासह अन्य खाद्यपदार्थ आणि जोडीला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून शास्त्री वॉर्ड येथील युवा एकता समितीचे पदाधिकारी बबलु रहांगडाले, निशांत मोरघडे, दिपक खोब्रागडे, अतुल बैस, रविंद्र इंदूरकर, अरविंद राऊत, आकाश बैस, राजेश गंगभोज यांनी परिसरातील वृक्षांवर आश्रय घेत असलेल्या पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून उद्देशाने कृत्रिम जलकुंडाच्या माध्यमातून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच इतरांनी निसर्गाची अनमोल देण असलेल्या पक्ष्यांच्या संरक्षणार्थ पुढाकार घ्यावा, असे आवाहनही युवा एकता समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
सर्वाचाच हातभार हवा
पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात लहान मुलांबरोबरच वयोवृध्दही आघाडीवर आहेत. वेळ मिळेल तेव्हा पाण्याचे भांडे स्वच्छ करून त्यात थंड पाणी घातले जात आहे. पक्ष्यांना काही तरी खायला मिळावे म्हणून खाद्यपदार्थही ठेवले जातात. शहराच्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. मनुष्य आपल्या परीने पाण्याची सोय करुन घेणार मा मुक्या जिवांचे काय? असा प्रश्न उपस्थित करून पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षण व्हावे, यासाठी समाजस्तरावर सर्वाचाच हातभार हवा, असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे.