घुमान साहित्य संमेलनाचा दिमाखात समारोप

0
26

घुमान : दिमाखात सुरू झालेल्या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज समारोप घुमान येथे समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या समारोप समारोहादरम्यान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक ठराव माडंण्यात आले आहेत. यामध्ये मराठी भाषेच्या विकासापासून ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दलच्या ठरावाचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सर्वच मान्यवरांचा आग्रह यावेळी दिसून आला. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या प्रत्येक घडामोडींचे थेट प्रेक्षपण आकाशवाणी, दूरदर्शनवर व्हावे, जेणे करून दूरवर पसरलेला मराठी माणूस यामाध्यमातून संमेलनाशी जोडला जावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा निषेध
साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याच्या सुरुवातीलाच प्रकाश पायगुडे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. श्रद्धांजलीच्या ठरावानंतर अध्यक्षीय ठरावात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा कोणताही तपास लागला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच कॉम्रेड पानसरेंच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोध घ्यावा, अशीही मागणी केली गेली.
घुमान ते पंढरी रेल्वेने जोडण्याची मागणी
यंदाचे साहित्य संमेलन संत नामदेवांची कर्मभूमी घुमान येथे झाले आहे. तसेच घुमानला येण्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी नेहमीच उत्सूक असतात. तर घुमान येथील नामदेवांची शिकवण पुढे नेणाऱ्या भक्तांना आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्याची उत्सूकता असते. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पंढरपूर ते घुमान दरम्यान ‘नामदेव एक्सप्रेस’ अशा नावाने एखादी रेल्वे सुरू करावी अशीही मागणी या समारोप मंचावरून करण्यात आली.

भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन
मराठी साहित्य क्षेत्रात भालचंद्र नेमाडेंच्या नावाने चौथा ज्ञानपीठ पुरस्कार दाखल झाला आहे. भालचंद्र नेमाडे यांना नुकताच ‘कोसला’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल नेमाडे यांचे संमेलनाच्या व्यासपीठावरून अभिनंदन करण्यात आले.