कुठल्याही एटीएममधून भरा खात्यात पैसे

0
10

मुंबई- आपल्याच बँक खात्यात पैसे भरण्यासाठी ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे ग्राहकांची चीडचीड होते. खातेदारांचा बहुमूल्य वेळ फुकट जातो. यातून मार्ग काढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया एका महत्त्वपूर्ण योजनेवर काम करत आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यानंतर ग्राहकांना स्वत:च्या बँकेत पैसे भरायला जाण्याची गरजच उरणार नाही. आपल्या बँक खात्यात केव्हाही, कुठेही आणि कधीही अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे भरता येऊ शकतील.
सध्या एटीएमचा वापर आपण पैसे काढण्यासाठी करतो. आता पैसे स्वीकारणारीही एटीएम मशिन्स आली आहेत. या मशिन्सचे देशव्यापी नेटवर्क जोडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे कोणत्याही बॅँकेच्या ग्राहकाला या एटीएममध्ये जाऊन आपल्या बँक खात्यात पैसे भरता येऊ शकतात. सध्या देशातील सर्व एटीएम ही नॅशनल फायनान्शियल स्वीचला (एनएफएस) जोडलेली आहेत. हीच एटीएम आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनला (एनपीसीआय) जोडली जातील. त्यामुळे बँक खातेदारांना अन्य बॅँकांच्याही एटीएममध्ये पैसे भरता येऊ शकतात, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी सांगितले.
या योजनेसाठी किती शुल्क आकारावे याबाबत बॅँकांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. रिझव्‍‌र्ह बॅँकेने त्यांना याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, एखादे तंत्रज्ञान किंवा नवीन योजना राबवताना नफा मिळवणारी ठरली पाहिजे. नवीन योजनेतून खर्चही भरून न निघाल्यास त्याचा विस्तार होऊ शकत नाही. त्यामुळे ही योजना राबवताना आम्ही नफ्याचा आणि अन्य बाबींचा विचार करत आहोत, असे खान यांनी सांगितले.