राहुल गांधी करणार १५ किमी पायपीट

0
16

अमरावती – ‘विदर्भातीलआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांचे सांत्वन करण्याकरिता काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी, ३० एप्रिलला एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगावरेल्वे आणि चांदूररेल्वे तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नऊ शेतकऱ्यांच्या परिवारांची राहुल गांधी भेट घेणार आहे. या वेळी गुंजी ते रामगावपर्यंत चार तासात १५ किलोमीटरची पदयात्रा राहुल गांधी काढणार आहे’, अशी माहिती काँग्रेसचे चांदूररेल्वे मतदारसंघाचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी मंगळवारी, २८ एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष संजय अकर्ते, बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर अमरावतीजिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे बुधवारी, २९ एप्रिलला रात्री नागपुरात आगमन होणार आहे. रात्री च्या सुमारास राहुल यांचे दिल्लीहून विमानाने नागपुरात आगमन होईल. रवी भवनात त्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर गुरुवारी पहाटे ते अमरावती जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत. सुमारे वर्षभरानंतर राहुल नागपुरात येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, ते आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याने शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे नागपुरात छोटेखानी स्वागत केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे राहणार आहेत.

शेतक-यांच्या प्रश्नावर राहुल लोकसभेत गरजले
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौ-यावर टीका करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी आणि भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
मोदीजी सध्या भारतात आले आहेत, तर त्यांनी जरा वेळ काढून पंजाबला जावे आणि तेथील शेतक-यांची काय अवस्था आहे हे पहावे, असा सल्लाही राहुल यांनी पंतप्रधानांना दिला. जर पंतप्रधान पंजाबला गेले तर त्यांना शेतक-यांच्या दुःखाची कल्पना येईल, असे ते म्हणाले.
शेतक-यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्तावावर चर्चा करताना राहुल गांधी भाजपा सरकार आणि मोदींवर अक्षरश: तुटून पडले.
शेतक-यांची महत्त्वाची अनुदाने बंद केली, तरी शेतकरी गप्प बसला. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याऐवजी लाठ्या पडल्या, तेही शेतक-यांनी सहन केले. आता बाजारातील गहू पडून आहे, त्याला उठाव नाही, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे, काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे, अशा प्रकारे शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत राहुल यांनी सरकारला धारेवर धरले.
यावेळी ‘तुमचे सरकार कोणासाठी आहे‘ असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्यावेळी भाजपाच्या खासदारांनी ‘तुमचे नाही, आपले सरकार‘ अशी आरडाओरड केली. त्यावर प्रत्युत्तर देत ‘हाँ, ये हमारी सरकार है, आपकी सरकार है, लेकिन किसान और मजदुरों की सरकार नही है, अशा शब्दात त्यांनी सत्ताधा-यांना फटकारले.