मराठी पत्रकार परिषदेचे ४० वे अ भा अधिवेशन

0
25

६ आणि ७ जून रोजी पिंपरी चिंचवड येथे आयोजन
-मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
-समारोपाला अण्णा हजारे, डॉ. राजेंद्रसिंह, सदानंद मोरे उपस्थित राहणार
पुणे,दि-20-७५ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे ४० वे द्वैवार्षिक अधिवेशन येत्या ६ आणि ७ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अधिवेशनाचे थाटात उद्घाटन होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अधिवेशनाला देशभरातून अडीच हजार मराठी पत्रकारांची उपस्थिती लाभणार आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात होणार असलेल्या या अधिवेशनात दोन दिवसीय चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखती असे विविध आणि भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी विविध विषयांवर आपापल्या भूमिका विशद करणार आहेत, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक एस. एम. देशमुख यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे. ‘ज्ञानप्रकाशकार’ काकासाहेब लिमये यांनी स्थापन केलेल्या या संघटनेचे अध्यक्षपद ज. स. करंदीकर, न. र. फाटक, पा. वा. गाडगीळ, बाळासाहेब भारदे, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, बाबुराव जक्कल, रंगाअण्णा वैद्य, प्रभाकर पाध्ये, दादासाहेब पोतनीस, नारायण आठवले, अनंतराव पाटील, ह. रा. महाजनी, दा. वि. गोखले यांच्यासारख्या दिग्गज संपादक/पत्रकारांनी भूषविले आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्हे आणि ३४० तालुक्यांमध्ये परिषदेच्या शाखा असून दिल्ली, पणजी, हैदराबाद, बेळगाव आदी ठिकाणीही परिषद कार्यरत आहे. देशभरात ८,५०० पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत. परिषदेचे अधिवेशन दर दोन वर्षांनी होते. २०११ मध्ये अधिवेशन रोह्यात झाले होते. २०१३ मध्ये औरंगाबादला अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. १९४१ साली परिषदेचे दुसरे अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले होते. न. र. फाटक यांनी त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर प्रथमच पुणे परिसरात हे अधिवेशन होत असल्याने पत्रकारांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे. परिषदेचे विद्यमान अध्यक्ष किरण नाईक हे या अधिवेशनाचेही अध्यक्ष असणार आहेत. चंद्रशेखर बेहेरे हे विद्यमान कार्याध्यक्ष, संतोष पवार हे सरचिटणीस, सुभाष भारद्वाज आणि बंडू लडके हे उपाध्यक्ष आणि सिद्धार्थ शर्मा हे विद्यमान कोषाध्यक्ष आहेत.
या अधिवेशनाला पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, खा. शिवाजीराव अढळराव पाटील, खा. अमर साबळे, खा. श्रीरंग बारणे, विधानसभेचे माजी सभापती आ. दिलीप वळसे पाटील, आ. लक्ष्मण जगताप, आ. गौतम चाबुकवार, आ. महेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी परिषदेच्या माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समारोप समारंभ ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जल बिरादरीचे मॅगेसेसे पुरस्कार विजते डॉ. राजेंद्रसिंह, घुुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, झी-२४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर, मी मराठी वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईट, शिवसेनेच्या तडफदार नेत्या आ. नीलम गोर्‍हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांचा त्यांना मिळालेल्या ‘स्टॉकहॉल्म’ पुरस्काराबद्दल अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत होणार्‍या पहिल्या सत्रात ‘मी अँकर’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यात दूरचित्रवाणीवर निवेदकाची भूमिका पार पाडणारे आपले अनुभव, गंमती-जमती आणि अँकर होण्यासाठीच्या पात्रता यावर आपली मते मांडणार आहेत. या चर्चासत्रात एबीपी माझाचे मिलिंद भागवत, आयबीएन-लोकमतचे अमोल परचुरे, झी-२४ तासचे अजित चव्हाण, जय महाराष्ट्रच्या सुवर्णा जोशी, मी मराठीच्या वृषाली यादव आणि टीव्ही-९ चे वैभव कुलकर्णी सहभागी होत आहेत.
‘पत्रकार संरक्षण कायदा’वर परिसंवाद
दुपारच्या सत्रात ४ ते ६ या वेळेत ‘पत्रकारांना संरक्षण कायद्याची खरोखरच गरज आहे काय?’, या विषयावर परिसंवाद होत आहे. ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, टाईम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, एनडीटीव्हीचे पत्रकार प्रसाद काथे, विजय भोसले, नवी दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नियंत्रक एस. एम. देशमुख आपल्या भूमिका मांडणार आहेत.
पत्रकारांना दैनंदिन वापराव्या लागणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकार’ या विषयावर सकाळ माध्यम समूहातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख दिनेश ओक यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत हा कार्यक्रम होईल. रात्री ९ ते ११.३० दरम्यान उदय साटम निर्मित ‘प्रिय अमुचा महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता ‘माध्यमांना सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय् काय?’, या विषयावर परिसंवाद होत आहे. त्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. नीलमताई गोर्‍हे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या अलका महाजन, एबीपी माझाचे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी, पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, पुढारीचे निवासी संपादक अनिल टाकळकर आदी मान्यवर आपली मते मांडतील. दुपारच्या सत्रात ११.३० वाजता ‘सोशल मीडियामुळे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचं महत्त्व कमी झालंय् काय?’, या विषयावर परिसंवाद होत आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर, माहिती आणि जनसंपर्क विभागातील उपसंचालक डॉ. गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार संजय भुस्कुटे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादानंतर दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत खुले अधिवेशन होणार आहे.
सायंकाळी ३.४५ वाजता एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून ते पत्रकारितेतील आपले अनुभव, बदलते प्रवाह आणि सभोवतालच्या घडामोडींवर आपली मते मांडणार आहेत. त्यांची मुलाखत समीरण वाळवेकर घेतील. सायंकाळी पाच वाजता समारोप समारंभ सुरू होईल. यावेळी अधिवेशनात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनात उपस्थित राहणार्‍या पत्रकारांची निवास आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. बाहेरून बस किंवा रेल्वेने येणार्‍या पत्रकारांसाठी शिवाजीनगर, स्वार गेट आणि पुणे स्टेशनवरून कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय भोसरीकडे जाण्यासाठी बससेवाही उपलब्ध आहे. अधिवेशनासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे, उपाध्यक्ष सुभाष भारद्वाज, विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बापूसाहेब गोरे, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बाळासाहेब ढसाळ, पुणे शहर अध्यक्ष राजेंद्र कापसे उपस्थित होते.