सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते एअर इंडियाच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

0
7

मुंबई दि. २२: पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने समता सप्ताहाच्या निमित्ताने 10 ते 16 एप्रिल 2015 दरम्यान मुंबई, पुणे व नागपूर येथे एअर इंडिया केबिन क्रु पदाच्या भरतीसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या भरतीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 34 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यापैकी 10 उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. या प्रशिक्षणार्थींचा मंगळवारी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमासाठी आमदार मिलिंद माने, बार्टीचे प्रकल्प संचालक डॉ. वसंत रामटेके, गौतम रसाळ, एच.बी. राठोड, हेमंत सुटे, श्रीमती आशा गांगुर्डे उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचे काम बार्टी या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. सर्व प्रशिक्षणार्थींनी हवाई उड्डाणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा श्री. बडोले यांनी दिल्या.

बार्टीच्या वतीने प्रशिक्षण देण्यासाठी हवाई उद्योग क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या 34 उमेदवारांमध्ये 11 अनुसूचित जाती, 2 भटक्या जमाती व विमुक्त जाती, 7 इतर मागास प्रवर्ग व उर्वरित 14 खुल्या प्रवर्गातून आहेत. कार्यक्रमात प्रशिक्षकांचाही श्री. बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्री. रामटेके यांनी तर सूत्रसंचालन श्री. राठोड यांनी केले.