महानायक अमिताभ होणार महाराष्ट्राचे व्याघ्रदूत

0
18

वृत्तसंस्था
मुंबई, दि.१० -राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित करत वनपर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने ज्येष्ठ अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बच्चन यांना केली होती. अमिताभ यांनी १० ऑगस्ट रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीला मान देत व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी होकार दिला आहे.
४ जुलै रोजी नागपूर येथे झालेल्या राज्यातील व्याघ्र संरक्षण फाऊंडेशनच्या बैठकीत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्यासाठी विनंती करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जुलै रोजी व्याघ्रदिनाचे औचित्य साधत अमिताभ बच्चन यांना महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती करणारे पत्र पाठविले होते. वनमंत्र्यांच्या विनंतीला मान देत महानायक अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्यास होकार दिला आहे.
अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता, जनमानसात त्यांच्या विषयी असलेला आदरभाव या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेत व्याघ्र संवर्धन व संरक्षण या संदर्भात जनजागृती करून या महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग नोंदवून ही लोकचळवळ निश्‍चितपणे यशस्वी होईल, असा विश्‍वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.