राकेश मारियांना बढती, जावेद अहमद मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

0
6

मुंबई, दि. ८ – शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांना पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याजागी जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राकेश मारियांना ३० सप्टेंबररोजी बढती मिळणे अपेक्षीत असताना २० दिवसांपूर्वीच त्यांची बढती देण्यात आल्याने पोलिस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुन्ह्यांचा शिताफीने तपास करणारे व आयुक्तपदावर असतानाही थेट रस्त्यावर उतरुन पोलिस दलाचे मनोबल वाढवणारे राकेश मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या शीना बोरा हत्या प्रकरण उलगडले होते. ३० सप्टेंबररोजी राकेश मारियांचा कार्यकाळ संपणार होता. त्यानंतरच मारियांना बढती मिळणे अपेक्षीत होते. बढती मिळण्यापूर्वी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी मारिया व त्यांची टीम अथक मेहनत घेत होती. मात्र आज (मंगळवारी) जपान दौ-यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारियांना बढती देण्याचा निर्णय घेतला. होमगार्डच्या पोलिस महासंचलकपदावर राकेश मारियांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.