“सनातन‘वरील बंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडा- राधाकृष्ण विखे-पाटील

0
8

कोल्हापूर दि. २० – पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेवर आरोप करणे योग्य नाही. हत्येमागे अन्य कारणेही असू शकतात, असे विधान करून दिशाभूल करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रायश्‍चित म्हणून जनतेची माफी मागावी. तसेच “सनातन‘वरील बंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडावा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
पाटील यांनी शास्त्रीनगर येथील पानसरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या संशयाची सुई “सनातन‘च्या दिशेने जाते. तपास योग्य गतीने होण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाने चौकशी अधिकाऱ्यांची बदली होता कामा नये. त्यासाठी अधिकाऱ्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. सनातनचा कार्यकर्ता पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतला. सहा महिन्यांनंतर का असेना, पण प्रकरणाचा छडा लागत आहे. यासाठी एसआयटीप्रमुख आणि कोल्हापूर पोलिस दल अभिनंदनास पात्र आहे; मात्र शासनाची भूमिका संशयास्पद आहे. मारेकरी कोण हे ठाऊक असूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तिन्ही हत्यांच्या मागे एकाच संघटनेचा हात असल्याचे पूर्वीच स्पष्ट झाले होते. तरीही शासनाने कारवाईस विलंब लावला. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या संयमाचा आणखी अंत न पाहता सनातनवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली.