नशामुक्त महाराष्ट्रसाठी तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा- राजकुमार बडोले

0
14

मुंबई दि.१: तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी ‘नशामुक्त महाराष्ट्र’ असा नारा देण्याची वेळ आली असून त्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.

आझाद मैदान ते गेट वे ऑफ इंडिया यादरम्यान निघालेल्या ‘आम्ही चाललो व्यसनमुक्ती’साठी रॅलीच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमात श्री. बडोले बोलत होते. यावेळी नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुंबई उपनगरच्या समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती शेरे, श्रीमती सोनवणे, कार्यक्रम अधिकारी आर.आर. पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे नशाबंदी मंडळ, मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, मुंबई शहर उपनगर कार्यालयाने या रॅलीचे आयोजन केले होते.

श्री. बडोले म्हणाले, देशाला 2020 मध्ये खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांना व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे. नशामुक्त देश, नशामुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आजच्या विद्यार्थी व तरुणांवर आहे. तरुण नशेपासून दूर झाल्यास एक वेगळी ऊर्जा असलेली पिढी निर्माण होईल. नशाबंदी मंडळ तसेच अनेक स्वयंसेवी संस्था समाजात यासंदर्भात अत्यंत चांगले काम करीत आहेत.

श्री.बडोले यांनी उपस्थितांना नशामुक्तीचा संकल्प दिला. या रॅलीमध्ये नशाबंदी मंडळ, मुंबई विद्यापीठाच्या विविध 50 महाविद्यालयांचे विद्यार्थी, एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, तसेच विविध संस्थाचे स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.