पवार देशाला न लाभलेले पंतप्रधान

0
8

विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण
बारामती दि.१८:शरद पवार म्हणजे देशाला न लाभलेले पंतप्रधान आहेत, अशा शब्दांत राहुल बजाज यांनी पवार यांचा गौरव केला. अरुण जेटली यांच्या उपस्थितीत त्यांनी ही जाहीर स्तुती केली. ते म्हणाले, सर्व क्षेत्रांत पारंगत असलेले असे हे व्यक्तिमत्त्व आहे. हे आपण राजकीय हेतूने बोलत नाही. मात्र, त्यांच्याबरोबर खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांचा अनुभव जवळून घेता आला आहे. त्यांनी शरद पवार आणि अरुण जेटली यांच्यासमवेतच्या जुन्या आठवणींंना उजाळा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामतीभेटीनंतर जेटली यांच्या बारामतीदौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. शरद पवार यांच्या माळेगाव येथील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी ते मुक्कामाला होते. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य टाळले. पवार यांनी शेतीविषयक केलेल्या धोरणात्मक मागण्यांवरदेखील अर्थमंत्री म्हणून जेटली यांनी भाष्य केले नाही.

बारामतीच्या विकासाने ग्रामीण भागात क्रांती झाली आहे. अशा १०० बारामती विकसित झाल्या, तर देशाचा विकास झपाट्याने होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी केले. विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ असे नामकरण करण्यात आले, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेटली बोलत होते. या वेळी शरद पवार, खासदार राहुल बजाज, पालकमंत्री गिरीश बापट, उद्योजक बाबा कल्याणी, माजी मंत्री अजित पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.