फ्रीशिप व शिष्यवृत्तीची रक्कम दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना द्यावी – राजकुमार बडोले

0
24

मुंबई दि.५: सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, फ्रीशिपची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी तसेच ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिले. 

सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती व फ्रीशिपचे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात श्री. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, समाज कल्याण प्रभारी आयुक्त एम.एम. आत्राम, मुंबई विभागाचे प्रभारी आयुक्त यशवंत मोरे, अवर सचिव प्र.पा. लुबाळ, अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त दिपक कुडते, पुण्याचे प्रादेशिक उपायुक्त विजया पवार, मुंबईच्या सहायक आयुक्त एम. एस. शेरे, सहायक आयुक्त उमेश घुले यांच्यासह संकेतस्थळाचे काम पाहणाऱ्या मास्टेक कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

श्री. बडोले म्हणाले, आतापर्यंत 6 लाख विद्यार्थ्यांनी फ्रीशिप, शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्यास अनेक अडचणी येत असल्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले नाहीत. अर्ज पूर्ण न भरला जाणे, संकेतस्थळावर लॉग इनचा कालावधी कमी असणे, शुल्काची रक्कम चुकीची दाखविणे आदी अनेक तक्रारी विभागाकडे आल्या आहेत. हा निष्काळजीपणा असून या त्रुटी दूर करण्यासंदर्भात मास्टेक कंपनीने तातडीने कार्यवाही करावी. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये यापुढे कोणतीही समस्या आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असतात. त्यांना शिष्यवृत्तीचे पैसे दिवाळीपूर्वी तातडीने मिळावेत. 

राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी कोणामुळे येतात, त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये, यासाठी विभागाने तातडीने पावले उचलावीत. तसेच ऑनलाईन संकेतस्थळाचे काम पाहणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी.